आम्ही भारतीय संघासमोर नमते घेतले नाही – फिंच

Mumbai
अॅरॉन फिंच

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत टी-२० स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेमुळे खेळाडूंना बरेच पैसे कमावण्याची संधी मिळते. त्यामुळे आयपीएल करार वाचवण्यासाठी २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि त्याच्या सहकार्‍यांसमोर नमते घेतले, त्यांना स्लेज केले नाही, असा गौप्यस्फोट ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने काही महिन्यांपूर्वी केला होता. परंतु, ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने हे आरोप खोडून काढले आहेत.

आयपीएल करार हवे असल्याने आम्ही भारतीय खेळाडूंसमोर नमते वैगरे घेतले नाही. त्या मालिकेत जे खेळाडू खेळले होते, त्यांना ही मालिका किती आव्हानात्मक झाली होती हे विचारा. ती मालिका योग्य पद्धतीनेच खेळली गेली. त्यामुळे क्लार्कने हे आरोप का केले हे मला कळत नाही, असे फिंच म्हणाला.

२०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत बॉल टॅम्परिंग प्रकरणातील सहभागामुळे ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे हे दोघे भारताविरुद्ध खेळू शकले नव्हते. तो काळ ऑस्ट्रेलियन संघासाठी अवघड होता असे फिंचने सांगितले. आमच्या संघात बरेच बदल झाले होते.

बरेच नवे खेळाडू संघात आले होते, ज्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारसा अनुभव नव्हता. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव, रविंद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विन असे अप्रतिम गोलंदाज भारताकडे असल्याने फलंदाजांचे काम फारच अवघड होते. आम्ही भारताला जास्तच चांगली वागणूक देत होतो असे क्लार्कला वाटले. मात्र, खरे तर आमचे बरेच खेळाडू संघात आपली जागा पक्के करण्याचा, कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करत होते, असे फिंच म्हणाला.