IPL 2020 : आमच्या गोलंदाजांची पॉवर-प्लेमधील कामगिरी निराशाजनक – अय्यर

पॉवर-प्लेच्या सहा षटकांनंतर मुंबईची १ बाद ६१ अशी धावसंख्या होती.

श्रेयस अय्यर

दिल्ली कॅपिटल्सवर मात करत मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. दिल्लीने यंदा उत्तम कामगिरी करताना पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, पण त्यांना जेतेपदाने हुलकावणी दिली. अंतिम सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १५६ अशी धावसंख्या उभारली होती. याचा पाठलाग करताना मुंबईचे सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी डावाची आक्रमक सुरुवात केली. त्यामुळे पॉवर-प्लेच्या सहा षटकांनंतर मुंबईची १ बाद ६१ अशी धावसंख्या होती. पॉवर-प्लेमध्ये गोलंदाजांना सर्वोत्तम खेळ न करता आल्याने आम्हाला सामना जिंकणे अवघड झाले, असे अंतिम सामन्यानंतर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला.

कदाचित थकव्यामुळे असेल, पण पॉवर-प्लेमध्ये आमच्या गोलंदाजांनी केलेली कामगिरी निराशाजनक होती, असे अय्यर म्हणाला. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. याबाबत अय्यरने सांगितले, आमचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्यच होता. अंतिम सामन्यात खेळताना तुम्हाला चांगली सुरुवात मिळणे गरजेचे असते. मात्र, फलंदाजीत आम्ही पॉवर-प्लेमध्ये विकेट गमावल्या. आमच्या सुरुवातीच्या फलंदाजांवर वेगाने धावा करण्याचा दबाव होता आणि या दबावामुळेच बहुधा आम्ही तीन विकेट लवकर गमावल्या. त्यानंतर विकेट न गमावता आम्ही धावा करणे गरजेचे होते. आम्ही १५ व्या षटकापर्यंत चांगली धावसंख्या (११८) उभारली होती. परंतु, त्यानंतर आम्हाला म्हणावी तशी फटकेबाजी करता आली नाही.