घरक्रीडा२००२ नेटवेस्ट मालिका जिंकल्यावर बेभान झालो - गांगुली

२००२ नेटवेस्ट मालिका जिंकल्यावर बेभान झालो – गांगुली

Subscribe

२००२ नेटवेस्ट मालिका जिंकल्यावर कर्णधार गांगुलीने लॉर्ड्सच्या बाल्कनीत आपला टी-शर्ट काढून हवेत भिरकावला. ही आठवण प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या मनात आजही ताजी आहे.

आम्ही २००२ नेटवेस्ट मालिका जिंकल्यावर बेभान झालो. परंतु, इतक्या मोठ्या विजयानंतर हे अपेक्षितच होते, असे विधान भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने केले. १३ जुलै २००२ रोजी लॉर्ड्सवर झालेल्या अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडने भारतासमोर ३२६ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना भारतीय संघ अडचणीत सापडला होता. परंतु, मोहम्मद कैफ (नाबाद ८७) आणि युवराज सिंग (६९) यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर कर्णधार गांगुलीने लॉर्ड्सच्या बाल्कनीत आपला टी-शर्ट काढून हवेत भिरकावला. ही आठवण प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या मनात आजही ताजी आहे.

सर्वोत्तम क्रिकेट सामन्यांपैकी एक

आमच्यासाठी तो क्षण खूप मोठा होता. भारतीय क्रिकेटसाठी तो विजय महत्त्वाचा होता. त्यामुळे तो सामना जिंकल्यावर आम्ही बेभान झालो. थोडे वाहवत गेलो. एका क्षणाला आम्ही तो सामना जिंकू असे कोणालाही वाटले नव्हते. तुम्ही जेव्हा अवघड परिस्थितीतून मार्ग काढून सामना जिंकता, तेव्हा नेहमीपेक्षा अधिक जल्लोष करता. मी खेळलेल्या सर्वोत्तम क्रिकेट सामन्यांपैकी तो एक होता, असे गांगुलीने सांगितले. तो भारताचा सलामीवीर मयांक अगरवालसोबत संवाद साधत होता.

- Advertisement -

तुलना करणे अवघड

गांगुलीच्याच नेतृत्वात भारतीय संघ २००३ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभूत झाला होता. ऑस्ट्रेलियाने भारताचा १२५ धावांनी धुव्वा उडवला होता. २००२ नेटवेस्ट मालिकेचा आणि २००३ विश्वचषकाचा अंतिम सामना याची तुलना करण्यास सांगितल्यावर गांगुली म्हणाला की, या दोन सामन्यांची तुलना करणे अवघड आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आम्हाला चांगला खेळ करता आला नाही आणि ऑस्ट्रेलियाने आमच्यावर मात केली. आमच्या काळातील तो सर्वोत्तम संघ होता. नेटवेस्ट मालिकेबाबत बोलायचे तर इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये लॉर्ड्सवर शनिवारी अंतिम सामना जिंकणे यासारखी दुसरी गोष्ट नाही. तो विजय खूपच खास होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -