घरक्रीडाकोण होणार नवा जगज्जेता?

कोण होणार नवा जगज्जेता?

Subscribe

मागील चार वर्षांची मेहनत, मागील दीड महिन्यात केलेली उत्कृष्ट कामगिरी यांच्या जोरावर यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांनी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. या दोन कधीही विश्वचषक न जिंकलेल्या संघांमधील अंतिम सामना क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर रविवारी रंगणार आहे. १९९२ नंतर पहिल्यांदाच दोन विश्वचषक न जिंकलेल्या संघांमध्ये अंतिम फेरीचा सामना होणार आहे.या सामन्यात यजमानांचे पारडे जड मानले जात असले तरी न्यूझीलंडच्या गाठीशी मागील विश्वचषकाच्या (२०१५) अंतिम फेरीत खेळण्याचा अनुभव आहे.

मागील विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवामुळे त्यांचे पहिल्यांदा विश्वविजेते होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. दुसरीकडे यजमान इंग्लंडला हा विश्वचषक जिंकण्याचे प्रमुख दावेदार मानले जात होते. त्यातच त्यांनी तब्बल २७ वर्षांनी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ आपला सर्वोत्तम खेळ करून पहिल्यांदा विश्वविजेते होण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील.

- Advertisement -

मागील विश्वचषकात या दोन संघांची कामगिरी अगदी विरुद्ध होती. न्यूझीलंडने घरच्या मैदानावर झालेल्या या विश्वचषकात अफलातून प्रदर्शन करत पहिल्यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. इंग्लंडची कामगिरी मात्र अतिशय निराशाजनक होती. त्यांना बाद फेरीही गाठण्यात अपयश आले. त्यामुळे त्यांनी संघात आणि आपल्या खेळण्याच्या पद्धतीत बदल केले. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्त्वात आणि ट्रेवर बेलिस यांच्या मार्गदर्शनाखाली मागील चार वर्षांत इंग्लंडने दमदार कामगिरी केली आहे. एकेकाळी केवळ कसोटी क्रिकेटला महत्त्व देणार्‍या इंग्लंडला चार वर्षांत तीनशेची धावसंख्या अगदी सहज पार करण्याची जणू सवय लागली आहे. त्यामुळे त्यांच्या घरच्या मैदानावरील हा विश्वचषक जिंकण्याचे त्यांना प्रमुख दावेदार मानले जात होते. त्यांना या स्पर्धेच्या साखळी सामन्यांत सातत्यपूर्ण प्रदर्शन करता आले नाही. सुरुवातीच्या ७ पैकी ३ सामने गमावल्यामुळे ते उपांत्य फेरी गाठणार नाहीत अशी भीती चाहत्यांना वाटली होती.

मात्र, त्यांना योग्यवेळी आपला खेळ उंचावण्यात यश आले. त्यांनी अखेरचे दोन साखळी सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि या फेरीत त्यांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियावर मात केली. या सामन्यात त्यांचे सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी सलग तिसर्‍यांदा शतकी भागी केली. त्यांना कर्णधार मॉर्गन आणि जो रूट यांची चांगली साथ लाभली. तसेच क्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर, मार्क वूड या तेज त्रिकूटासोबतच आदिल रशीदच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाच्या डावाला खीळ घातली. आता अंतिम फेरी जिंकत पहिल्यांदा विश्वविजेते होण्यासाठी त्यांना या कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल.

- Advertisement -

केन विल्यमसनच्या न्यूझीलंडने या विश्वचषकाची अप्रतिम सुरुवात करत सुरुवातीच्या ६ पैकी ५ सामने जिंकले. मात्र, त्यानंतर सलग तीन सामने गमावल्यामुळे त्यांना अखेरच्या क्षणापर्यंत उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी वाट पाहावी लागली. त्यांचा उपांत्य फेरीत बलाढ्य भारताशी सामना झाला, ज्यात ते पराभूत होतील अशी म्हटले जात होते. परंतु विल्यमसन आणि रॉस टेलर या अनुभवी जोडीची अप्रतिम फलंदाजी आणि मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, मिचेल सँटनर यांची उत्कृष्ट गोलंदाजी यामुळे न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव केला. साखळी सामन्यांप्रमाणेच या सामन्यातही विल्यमसन आणि टेलर वगळता इतर फलंदाजांना चांगले प्रदर्शन करण्यात अपयश आले. त्यामुळे विश्वचषकावर पहिल्यांदा आपले कोरण्यासाठी या फलंदाजांना आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.

संघ –

इंग्लंड : इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, जॉस बटलर (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, क्रिस वोक्स, मोईन अली, आदिल रशीद, लियम प्लंकेट, जोफ्रा आर्चर, टॉम करन, मार्क वूड, जेम्स विन्स, लियम डॉसन.

न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, कॉलिन मुनरो, रॉस टेलर, टॉम लेथम (यष्टीरक्षक), हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल, कॉलिन डी ग्रँडहोम, मिचेल सँटनर, जिमी निशम, इश सोधी, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, टीम साऊथी, ट्रेंट बोल्ट.

इंग्लंड वि. न्यूझीलंड

विश्वचषक
सामने – ९
इंग्लंड विजयी – ४
न्यूझीलंड विजयी – ५

एकदिवसीय क्रिकेट

सामने – ९०
इंग्लंड विजयी – ४१
न्यूझीलंड विजयी – ४३
बरोबरीत – २
अनिर्णित – ४

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -