कसोटीतील कामगिरीमुळे एकदिवसीय संघात परतणार!

Mumbai
अजिंक्य रहाणेचे मत

भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने मागील काही सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात रहाणेने आपले कसोटी कारकिर्दीतील दहावे शतक लगावले होते. हे त्याचे दोन वर्षांतील पहिले शतक होते. त्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धही शतक झळकावले. कसोटीत चांगली कामगिरी करणारा रहाणे फेब्रुवारी २०१८ नंतर एकदिवसीय क्रिकेट मात्र खेळलेला नाही. परंतु, कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत राहिल्यास एकदिवसीय संघात पुनरागमन करण्याचा रहाणेला विश्वास आहे.

मला केवळ कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत राहण्याची गरज आहे. मी जर कसोटीत सातत्याने धावा करत राहिलो, तर एकदिवसीय संघात पुनरागमन करण्याचा मला विश्वास आहे. मला केवळ स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. मी भविष्याचा विचार न करता वर्तमानात राहण्याचा प्रयत्न करतो आणि हे माझ्यासाठी फायदेशीर ठरते. कसोटी क्रिकेटमध्ये संघाच्या यशात योगदान देत राहिल्यास मी एकदिवसीय संघात पुनरागमन करेन याची मला खात्री आहे, असे रहाणे म्हणाला. ३१ वर्षीय रहाणेने आतापर्यंत ९० एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले असून या सामन्यांत त्याने ३५.२६ च्या सरासरीने २९६२ धावा केल्या आहेत. यात ३ शतके आणि २४ अर्धशतकांचा समावेश आहे.

रहाणेला एकदिवसीय संघात पुनरागमन करायचे असले तरी सध्या त्याने आगामी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे १४ नोव्हेंबरपासून सुरु होणार्‍या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत त्यांचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, बांगलादेशला नमवण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम खेळ करण्याशिवाय पर्याय नाही, असे रहाणेने स्पष्ट केले.

बांगलादेशचा संघ एकजुटतेने खेळतो. त्यामुळे आम्हाला कसोटी मालिका जिंकण्यासाठी सर्वोत्तम खेळ करण्याशिवाय पर्याय नाही. आम्ही प्रतिस्पर्धी संघाचा विचार न करता आमच्या खेळावर लक्ष केंद्रित करतो. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमुळे प्रत्येक सामन्याला विशेष महत्त्व आले आहे. आम्ही आता केवळ इंदूर येथे होणार्‍या पहिल्या कसोटी सामन्याचा विचार करत आहोत. आमच्या संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फारच चांगला खेळ केला. मात्र, संघ म्हणून आम्हाला आता वर्तमानात राहण्याची गरज आहे, असे रहाणेने सांगितले.

डे-नाईट कसोटी खेळण्यास उत्सुक!

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना डे-नाईट (प्रकाशझोतात) होणार आहे. हा भारताचा पहिलावहिला डे-नाईट कसोटी सामना असेल. त्यामुळे या नव्या आव्हानासाठी मी उत्सुक आहे, असे अजिंक्य रहाणेने सांगितले. मी डे-नाईट कसोटी खेळण्यासाठी खूप उत्सुक आहे. हे आमच्यासाठी नवे आव्हान आहे. हा सामना किती यशस्वी होईल हे आता सांगणे अवघड आहे. तसेच गुलाबी चेंडू किती स्विंग होतो आणि कशी हालचाल करतो हे आम्हाला काही सराव सत्रांनंतर कळेल, असे रहाणेने नमूद केले.