घरक्रीडाआयपीएलची परदेश वारी पक्की?

आयपीएलची परदेश वारी पक्की?

Subscribe

बीसीसीआयला सर्वाधिक महसूल आयपीएल स्पर्धेतून मिळतो. आयपीएल न झाल्यास बीसीसीआयचे तब्बल ४ हजार कोटींचे नुकसान होऊ शकेल, असे काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला होता. त्यामुळे यंदा ही स्पर्धा व्हावी यासाठी बीसीसीआय सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. आयपीएल भारतातच घेण्याला गांगुली प्राधान्य देणार असला तरी भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा ही स्पर्धा परदेशात घेणे भाग पडू शकेल. तसे झाल्यास आयपीएलचा संपूर्ण मोसम भारताबाहेर होण्याची ही दुसरी वेळ असेल.            

भारतात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार विविध उपाययोजना राबवत या विषाणूवर नियंत्रण मिळवण्याचा खूप प्रयत्न करत आहे. परंतु, त्यांना अजूनही फारसे यश आलेले नाही. आता लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणण्यात आली असली तरी खेळ अजूनही सुरु झालेले नाहीत. चार महिने झाले तरी खेळ बंद असल्याने देशातील सर्वच क्रीडा मंडळांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटनाही याला अपवाद नाही.

बीसीसीआयला सर्वाधिक महसूल हा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या लोकप्रिय टी-२० स्पर्धेतून मिळतो. यंदा या स्पर्धेला २९ मार्चपासून सुरुवात होणार होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयला ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करावी लागली. आयपीएल न झाल्यास बीसीसीआयचे तब्बल ४ हजार कोटींचे नुकसान होऊ शकेल, असे काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला होता. त्यामुळे ही स्पर्धा व्हावी यासाठी बीसीसीआय सर्वोतपरी प्रयत्न करत असून गांगुलीने सर्व राज्य क्रिकेट संघटनांना याबाबतचे पत्र पाठवले आहे.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-२० विश्वचषक होणार आहे. मात्र, ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यातच मेलबर्नमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने तिथे पुन्हा लॉकडाऊन करावे लागले आहे. सध्याच्या परिस्थितीत ऑस्ट्रेलियात विश्वचषक आयोजित करणे जवळपास अशक्यच असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयसीसीला कळवले आहे आणि त्यामुळे आयसीसीने अजून अधिकृत घोषणा केली नसली तरी यंदाचा टी-२० विश्वचषक लांबणीवर पडणार हे निश्चितच आहे. बीसीसीआय या काळात आयपीएल घेण्यास उत्सुक आहे. परंतु, भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी होत नसल्याने यंदा ही स्पर्धा कुठे आणि कधी घ्यायची हा गांगुली व बीसीसीआयपुढे मोठा प्रश्न आहे.

युएई आणि श्रीलंकेपाठोपाठ न्यूझीलंडने यंदा आयपीएलच्या आयोजनाची तयारी दर्शवली आहे, अशी चर्चा सुरु होती. मात्र, न्यूझीलंड क्रिकेटच्या रिचर्ड बुक यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला असून आम्ही बीसीसीआयसमोर कोणताही प्रस्ताव ठेवला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे भारतात ही स्पर्धा होणे शक्य नसल्यास बीसीसीआयपुढे आता युएई आणि श्रीलंका असे दोनच पर्याय आहेत. याआधी लोकसभा निवडणूकीमुळे २०१४ मोसमाचे सुरुवातीचे काही सामने युएईमध्ये पार पडले होते. यंदा मात्र काही सामने नाही, तर संपूर्ण स्पर्धाच युएईत होऊ शकेल. युएईमध्ये आतापर्यंत ५४ हजारहून अधिक व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली असून ३२५ हून अधिक जणांनी आपले प्राण गमावले आहेत. याऊलट केवळ महाराष्ट्रातच २ लाख ३८ हजारांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

- Advertisement -

मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, चेन्नई या शहरांत आयपीएलचे सर्वात लोकप्रिय संघ आहेत. यापैकी दिल्ली, मुंबई आणि चेन्नईमध्ये भारतातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे यंदा ही स्पर्धा भारतातच होणार हे मी आताच ठामपणे सांगू शकत नाही असे गांगुली म्हणाला होता. आयपीएल भारतातच घेण्याला गांगुली प्राधान्य देणार असला तरी बहुधा त्याच्यापुढे ही स्पर्धा परदेशात घेण्यावाचून पर्याय नाही. मात्र, परदेशात आयपीएल झाल्यास खर्च वाढू शकेल. आयपीएल फ्रेंचायझींना २० ते २५ टक्के महसूल हा बीसीसीआयच्या मीडिया राईट्स आणि प्रयोजकांकडून मिळतो. ही स्पर्धा न झाल्यास बीसीसीआयप्रमाणेच आठही फ्रेंचायझींचेही मोठे आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे गरज भासल्यास अगदी प्रेक्षकांविना परदेशात ही स्पर्धा खेळवण्यासही बीसीसीआय आणि फ्रेंचायझीस तयार होतील हे नक्की!

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -