धोनी सोबत असताना विराटचे नेतृत्व बहरते

Mumbai
अनिल कुंबळेचे मत

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका २-३ अशी गमावली. या मालिकेत भारताकडे २-० अशी आघाडी होती. विश्वचषकाआधीची ही अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका असल्याने भारतीय संघ व्यवस्थापनाने काही अनुभवी खेळाडूंना विश्रांती देऊन राखीव खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला. या मालिकेतील अखेरच्या २ सामन्यांसाठी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला विश्रांती देण्यात आली होती आणि त्याच्या अनुपस्थितीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने मोक्याच्या क्षणी काही चुकीचे निर्णय घेतले. त्यामुळे या सामन्यांमध्ये विराटच्या मदतीला धोनी असता तर या मालिकेचा निकाल कदाचित वेगळा लागला असता, असे काही समीक्षकांचे मत होते. आता भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेनेही काहीसे असेच मत व्यक्त केले आहे. धोनी सोबत असेल तर विराटचे नेतृत्व बहरते, असे तो म्हणाला.

विराट हा चांगला कर्णधार नाही असे मी अजिबातच म्हणणार नाही, पण धोनी सोबत असल्यास त्याचे नेतृत्व अधिक बहरते. मैदानावर या दोघांमध्ये जो संवाद होतो, त्यातून विराट मैदानावर चांगले निर्णय घेतो. धोनीने एका प्रदीर्घ कालावधीपर्यंत भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे त्याच्या गाठीशी असणारा अनुभव हा इतर खेळाडूंपेक्षा नक्कीच जास्त आहे. तो इतरांपेक्षा सामन्याचा अंदाज अधिक योग्यपणे लावू शकतो. तो यष्टीरक्षक असल्यामुळे संपूर्ण सामना हा त्याच्यासमोर होत असतो. त्यामुळे गोलंदाजाने टप्पा कुठे टाकावा, क्षेत्ररक्षण कसे लावावे याचा अंदाज धोनी बरोबर लावतो. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट हा धोनीवर अवलंबून आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या २ सामन्यांत विराटला धोनीची उणीव नक्कीच भासली, असे कुंबळे म्हणाला.

काही दिवसांत सुरू होणार्‍या आयपीएलमुळे विश्वचषकाआधी खेळाडूंचा फिटनेस ढासळेल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. आयपीएलदरम्यानच सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने पहिल्या दोन आठवड्यानंतर ही स्पर्धा भारतातच होणार का परदेशात हे अजून निश्चित नाही आणि त्यामुळे खेळाडूंना आपला फिटनेस राखणे आव्हानात्मक होऊ शकेल, असे कुंबळेचे मत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here