महिला ‘बिग बॅश लीग’ दरम्यान टी-२० चॅलेंज स्पर्धा कशासाठी? 

महिलांची आयपीएल स्पर्धा यंदा १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.   

अलिसा हिली

महिलांची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा म्हणजेच टी-२० चॅलेंज यंदा १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत तीन संघांमध्ये खेळवण्यात येणार असल्याचे रविवारी बीसीसीआयने सांगितले. पुरुषांच्या आयपीएलचे प्ले-ऑफ सामने होत असताना महिलांची टी-२० चॅलेंज स्पर्धा पार पडणार आहे. मात्र, बीसीसीआयच्या या निर्णयावर ऑस्ट्रेलियाच्या काही महिला क्रिकेटपटूंनी टीका केली आहे. महिला ‘बिग बॅश लीग’ दरम्यान टी-२० चॅलेंज स्पर्धा घेतल्यास आम्ही त्यात खेळायचे कसे?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

महिला क्रिकेटमधील सर्वात मोठी टी-२०

महिलांची बिग बॅश लीग स्पर्धा ही महिला क्रिकेटमधील सर्वात मोठी टी-२० स्पर्धा मानली जाते. यंदा ही स्पर्धा १७ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. त्यामुळे १ ते १० नोव्हेंबरमध्ये महिलांची आयपीएल स्पर्धा झाल्यास भारताच्या खेळाडूंना महिला बिग बॅश लीगमध्ये खेळता येणार नाही आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये खेळता येणार नाही. तसेच इतर देशांच्या महिला क्रिकेटपटूंना या दोनपैकी एका स्पर्धेची निवड करावी लागणार आहे.

त्यांनी काय करायचे?

त्यामुळे ‘बिग बॅश दरम्यान टी-२० चॅलेंज स्पर्धा घेण्यात येणार..बरं ठीक आहे,’ असे ट्विट करत ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक अलिसा हिलीने आपली नाराजी व्यक्त केली. तसेच ‘ज्या भारतीय खेळाडू महिला बिग बॅश संघांशी करारबद्ध आहेत, त्यांनी काय करायचे? तसेच इतर अव्वल आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू दोन्ही स्पर्धांत कशा खेळणार? याचा निर्णय कोण घेणार,’ असे प्रश्नही हिलीने ट्विटद्वारे उपस्थित केले. हिलीप्रमाणेच जेस जोनासन आणि रेचल हेन्स यांनीही बीसीसीआयच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.