घरक्रीडान्यूझीलंड आव्हानही पार; भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश

न्यूझीलंड आव्हानही पार; भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश

Subscribe

महिला टी-२० वर्ल्डकप

सलामीवीर शेफाली वर्माच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर भारताने महिला टी-२० विश्वचषकाच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडला ३ धावांनी पराभूत केले. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडला जिंकण्यासाठी अखेरच्या चेंडूवर ५ धावांची आवश्यकता होती. मात्र, वेगवान गोलंदाज शिखा पांडेने अप्रतिम यॉर्कर टाकत न्यूझीलंडला केवळ १ धावा करु दिली. त्यामुळे भारतीय संघाने हा सामना जिंकला. आपल्या पहिल्या दोन सामन्यांत यजमान ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशचा पराभव करणार्‍या भारताचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय होता. या विजयासह भारताने उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे.

मेलबर्नला झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. भारताच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. अनुभवी सलामीवीर स्मृती मानधनाला अवघ्या ११ धावांवर लिह ताहूहूने माघारी पाठवले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २९ आणि बांगलादेशविरुद्ध ३९ धावांची खेळी करणार्‍या शेफाली वर्माने या सामन्यातही आपला फॉर्म कायम राखला. तिने या सामन्यात ३४ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४६ धावा केल्या. तिला तानिया भाटियाची (२३) उत्तम साथ लाभली. या दोघींनी दुसर्‍या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. या दोघी बाद झाल्यावर भारताच्या इतर फलंदाजांना फारसे योगदान देता आले नाही. अखेर राधा यादवने (९ चेंडूत १४) केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने २० षटकांत ८ बाद १३३ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली.

- Advertisement -

१३४ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. रेचल प्रिस्ट (१२), कर्णधार डिव्हाईन (१४) आणि अनुभवी सुझी बेट्स (६) या खेळाडू झटपट माघारी परतल्याने न्यूझीलंडची ३ बाद ३४ अशी अवस्था झाली. यानंतर मॅडी ग्रीन आणि केटी मार्टिन या चौथ्या जोडीने न्यूझीलंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघींनी ४३ धावांची भागीदारी उभारली. परंतु, ग्रीनला (२४) राजेश्वरी गायकवाडने, तर मार्टिनला (२५) पूनम यादवने बाद करत पुन्हा न्यूझीलंडला अडचणीत टाकले.

अमिलिया कर (१९ चेंडूत नाबाद ३४) आणि हेली जेन्सन (७ चेंडूत ११) या दोघींनी आक्रमक फलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या षटकात न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी १६ धावांची गरज होती. शिखा पांडे टाकत असलेल्या या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जेन्सनने, तर पाचव्या चेंडूवर करने चौकार लगावला. मात्र, अखेरच्या चेंडूवर ५ धावांची आवशक्यता असताना त्यांना एकच धाव काढता आल्याने भारताने हा सामना ३ धावांनी जिंकला.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक – भारत : २० षटकांत ८ बाद १३३ (शेफाली वर्मा ४६, तानिया भाटिया २३; अमिलिया कर २/२१, रोझमेरी मेर २/२७) विजयी वि. न्यूझीलंड : २० षटकांत ६ बाद १३० (अमिलिया कर नाबाद ३४, केटी मार्टिन २५; शिखा पांडे १/२१, राजेश्वरी गायकवाड १/२२).

आता आम्ही परिस्थिती अधिक चांगल्याप्रकारे हाताळतो – भाटिया
आमचा संघ बरेचदा दबावाच्या परिस्थितीत सर्वोत्तम खेळ करण्यात अपयशी ठरतो, असे महिला टी-२० विश्वचषक सुरु होण्यापूर्वी कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली होती. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध दबाव असताना भारतीय संघाने आपला खेळ उंचावत सामना जिंकला. आता आम्ही कोणतीही परिस्थिती अधिक चांगल्याप्रकारे हाताळतो, असे विधान भारताच्या तानिया भाटियाने केले. मागील १२-१४ महिन्यांत आमच्या संघात खूप सुधारणा झाली आहे. विश्वचषकाआधी झालेल्या तिरंगी मालिकेपासून आम्ही खूपच चांगला खेळ करत आहोत. आता आम्ही कोणतीही परिस्थिती अधिक चांगल्याप्रकारे हाताळतो. त्यामुळेच निकाल आमच्या बाजूने लागत आहेत. आम्ही पुढेही असाच खेळ सुरु ठेवला तर नक्कीच यशस्वी होऊ, असे भाटिया म्हणाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -