घरक्रीडाजागतिक बॅडमिंटन स्पर्धा

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा

Subscribe

भारताचे आघाडीचे खेळाडू पी.व्ही.सिंधू आणि साई प्रणित यांनी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे या दोघांनीही आपले पदक पक्के केले आहे. प्रकाश पदुकोण यांनी १९८३ साली या स्पर्धेत पुरुषांमध्ये कांस्यपदक मिळवले होते. त्यानंतर एकाही पुरुष बॅडमिंटनपटूला पदक जिंकता आले नाही. त्यामुळे जागतिक स्पर्धेत पदक मिळवणारा प्रणित हा ३६ वर्षांत पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू ठरला आहे. सिंधूचे जागतिक स्पर्धेतील हे पाचवे पदक असणार आहे.

पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रणितने जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असणार्‍या जॉनाथन क्रिस्टीचा २४-२२, २१-१४ असा सरळ गेममध्ये पराभव केला. या सामन्यातील पहिल्या गेममध्ये क्रिस्टीने प्रणितला चांगली लढत दिली. दुसर्‍या गेममध्ये मात्र प्रणितने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत ७-१ अशी आघाडी मिळवली. यानंतर क्रिस्टीला पुनरागमन करता आले नाही. त्यामुळे प्रणितने हा गेम २१-१४ असा जिंकत आगेकूच केली. त्याचा उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणार्‍या केंटो मोमोटाशी सामना होईल.

- Advertisement -

महिला एकेरीत सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी असणार्‍या तैवानच्या ताई झू यिंगवर १२-२१, २३-२१, २१-१९ अशी मात करत उपांत्य फेरी गाठली. या सामन्यातील पहिला गेम गमावल्यानंतर सिंधूने दुसरा गेम २३-२१ असा अवघ्या २ गुणांनी जिंकला. तिसर्‍या गेमच्या मध्याला यिंगकडे १४-१२ अशी आघाडी होती. मात्र, सिंधूने तिचा खेळ उंचावत १९-१९ अशी बरोबरी केली. यानंतर तिने सलग २ गुण मिळवत हा गेम आणि सामना जिंकला.

सायना पंचांवर नाराज
भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डने तिचा १५-२१, २७-२५, २१-१२ असा पराभव केला. या सामन्यात पंचांनी दिलेल्या काही निर्णयांवर सायनाने नाराजी व्यक्त केली. पंचांनी दुसर्‍या गेममध्ये २ मॅच पॉईंट नाकारले यावर विश्वास बसत नाही. त्यातच पंचांनी दुसर्‍या गेमच्या मध्यातलाईन पंचांना त्यांचे काम करू दे, असे सांगितले. पंचांनी अचानक ते मॅच पॉईंट का नाकारले, हे मला समजले नाही, असे सायनाने ट्विट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -