अमित पांघल उपांत्य फेरीत; भारताची दोन पदके निश्चित

जागतिक बॉक्सिंग स्पर्धा

Mumbai
अमित पांघल

भारताच्या अमित पांघल (५२ किलो) आणि मनीष कौशिक (६३ किलो) या बॉक्सर्सनी जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे या दोघांनी आपले पदकही निश्चित केले आहे. या दोन्ही बॉक्सर्सचे जागतिक स्पर्धेतील हे पहिलेच पदक आहे. ९१ किलो वजनी गटात संजीतचा मात्र पराभव झाला. त्याने सातव्या सीडेड हुलियो कॅस्टीलोविरुद्धचा सामना १-४ असा गमावला.

एशियाड आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या अमित पांघलने उपांत्यपूर्व फेरीत फिलिपिन्सच्या कार्लो पालमचा ४-१ असा पराभव केला. तर राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या कौशिकने ब्राझीलच्या वॅन्डरसनवर ५-० अशी मात केली.

उपांत्यपूर्व फेरीतील सामना जिंकल्यानंतर अमित म्हणाला, मी या सामन्याच्या सुरुवातीला चांगला खेळ केला नाही. मात्र, दुसर्‍या आणि तिसर्‍या फेरीत मी वर्चस्व प्रस्थापित केले. प्रशिक्षकांनी मला आक्रमकपणे खेळण्यास सांगितले होते आणि मी तेच करण्याचा प्रयत्न केला. मी पालमविरुद्ध याआधी खेळलो आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कसे खेळायचे याची मला कल्पना होती.

या स्पर्धेआधी भारतीय बॉक्सर्सनी एका स्पर्धेत एकापेक्षा जास्त कांस्यपदक पटकावले नव्हते. जागतिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत ४ कांस्यपदके मिळवली आहेत. ही पदके विजेंदर सिंग (२००९), विकास कृष्णन (२०११), शिवा थापा (२०१५) आणि गौरव बिधुरी (२०१७) यांनी मिळवली आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here