घरक्रीडावर्ल्डकपमधून भारताचे पॅकअप!

वर्ल्डकपमधून भारताचे पॅकअप!

Subscribe

उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून १८ धावांनी पराभूत

मॅट हेन्री आणि ट्रेंट बोल्टची उत्कृष्ट गोलंदाजी, तसेच रॉस टेलर, कर्णधार केन विल्यमसनच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारताचा १८ धावांनी पराभव केला. या पराभवामुळे भारताचे तिसर्‍यांदा विश्वविजेते होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. न्यूझीलंडने मात्र सलग दुसर्‍यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे दोन दिवस चालला.

मंगळवारी पावसामुळे खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडची ४६.१ षटकांत ५ बाद २११ अशी धावसंख्या होती. त्यापुढे खेळताना त्यांनी उर्वरित ३.५ षटकांमध्ये २९ धावांची भर घातली. त्यांच्याकडून रॉस टेलरने सर्वाधिक ७४ धावा केल्या. भारताच्या भुवनेश्वर कुमारने ३, तर जसप्रीत बुमराह, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्या यांनी १-१ विकेट घेतली.
२४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा (१), लोकेश राहुल (१) आणि कर्णधार विराट कोहली (१) सलग तीन षटकांमध्ये माघारी परतल्याने भारताची चौथ्या षटकात ३ बाद ५ अशी अवस्था झाली होती. दिनेश कार्तिकला फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. ६ धावांवर हेन्रीच्या गोलंदाजीवर त्याचा जिमी निशम अप्रतिम एक हाती झेल पकडला.

- Advertisement -

यानंतर रिषभ पंत (५६ चेंडूत ३२) आणि हार्दिक पांड्या (६२ चेंडूत ३२) यांनी काही काळ संयमाने खेळ केला. त्यांनी पाचव्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. मात्र, दोघेही फिरकीपटू मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाले. त्यामुळे भारताची ६ बाद ९२ अशी अवस्था झाली होती. यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि रविंद्र जाडेजा या अनुभवी जोडीने झुंजार खेळ करत ११६ धावांची भागीदारी केली. जाडेजाने आक्रमक फलंदाजी करत ३९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पुढे धावांची गती अधिक वाढवण्याच्या नादात तो ७७ धावांवर बाद झाला. त्याने या धावा ५९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने केल्या. तो बाद झाल्यानंतरही धोनी खेळपट्टीवर असल्याने भारताच्या विजयाच्या आशा जिवंत होत्या. मात्र, ५० धावांवर त्याला गप्टिलने धावचीत केले. यानंतर भुवनेश्वर आणि चहल बाद झाल्याने भारताचा डाव २२१ धावांवर संपुष्टात आला.

संक्षिप्त धावफलक

- Advertisement -

न्यूझीलंड : ५० षटकांत ८ बाद २३९ (रॉस टेलर ७४, केन विल्यमसन ६४; भुवनेश्वर कुमार ३/४३, रविंद्र जाडेजा १/३४) विजयी वि. भारत : ४९.३ षटकांत सर्वबाद २२१ (रविंद्र जाडेजा ७७, महेंद्रसिंग धोनी ५०; मॅट हेन्री ३/३७, मिचेल सँटनर २/३४, ट्रेंट बोल्ट २/४२).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -