घरक्रीडाछुपे रुस्तम!

छुपे रुस्तम!

Subscribe

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा, डेविड वॉर्नर, शाकिब अल हसन, विराट कोहली या फलंदाजांनी, तर मिचेल स्टार्क, जसप्रीत बुमराह, मुस्तफिझूर रहमान या गोलंदाजांनी आपल्या खेळाने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्यांच्या खेळाची सगळीकडे चर्चा आहे. मात्र, या खेळाडूंचे चांगले प्रदर्शन अपेक्षितच होते. परंतु या वर्ल्डकपमध्ये या खेळाडूंव्यतिरिक्तही काही असे खेळाडू आहेत, ज्यांनी अपेक्षेपेक्षा दमदार कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या खेळाडूंमध्ये सर्वात पहिले नाव ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक-फलंदाज अ‍ॅलेक कॅरीचे घेता येईल. मागील वर्षी मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या बॉल टॅम्परिंग प्रकरणातील सहभागामुळे तेव्हाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेविड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली. त्यामुळे यष्टीरक्षक टीम पेनची ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला चांगले प्रदर्शन करण्यात अपयश आल्याने युवा अ‍ॅलेक्स कॅरीला संधी देण्यात आली आणि त्याने या संधीचे सोने केले. सध्या सुरु असलेल्या वर्ल्डकपमध्ये त्याने ९ सामन्यांत ६६ च्या सरासरीने ३२९ धावा केल्या आहेत. तसेच संघ अडचणीत असताना त्याने आपला खेळ उंचावल्याचे पाहायला मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मागील सामन्यात त्याने ८५ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजयाच्या नजीक पोहोचवले होते, पण तो बाद झाल्याने त्यांचा पराभव झाला.

- Advertisement -

वेस्ट इंडिजचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज निकोलस पूरनने या वर्ल्डकपमध्ये अप्रतिम कामगिरी केली. सुरुवातीच्या काही सामन्यांत मोठे फटके मारण्याच्या नादात तो बाद झाला. मात्र, नंतर त्याने खेळात सुधारणा करत संयमाने खेळ केला. त्याने या स्पर्धेच्या ९ सामन्यांत १ शतक आणि २ अर्धशतकांच्या मदतीने ३६७ धावा केल्या. तोच विंडीजचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेच्या रॅसी वॅन डर डूसेसनेही या वर्ल्डकपमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने ९ सामन्यांत ६२ च्या सरासरीने ३११ धावा केल्या. मात्र, त्याला कर्णधार फॅफ डू प्लेसिस वगळता इतरांची साथ न लाभल्याने दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले.

गोलंदाजांमध्ये न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्युसन आणि बांगलादेशचा मोहम्मद सैफुद्दीनने दमदार प्रदर्शन केले. फर्ग्युसनने आपल्या तेजतर्रार मार्‍याने फलंदाजांना अडचणीत टाकत १७ विकेट्स पटकावल्या. न्यूझीलंडने आगेकूच करण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. तसेच बांगलादेशला आगेकूच करता आली नसली तरी सैफुद्दीनच्या रूपात त्यांना अप्रतिम युवा गोलंदाज लाभला. त्याने या स्पर्धेच्या ७ सामन्यांत १३ गडी बाद करत २० विकेट्स घेणार्‍या मुस्तफिझूरला चांगली साथ दिली. इंग्लंडच्या मार्क वूडनेही १६ विकेट्स घेत सर्वांना प्रभावित केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -