घरक्रीडाअ‍ॅशेसची रंगीत तालीम

अ‍ॅशेसची रंगीत तालीम

Subscribe

यजमान इंग्लंडने अ‍ॅास्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला आणि तब्बल २७ वर्षानंतर वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. रविवारी लॉर्डसवर क्रिकेटच्या मक्केत इंग्लंडची अंतिम झुंज रंगेल न्यूझीलंडशी. कमालीच्या एकतर्फी लढतीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला सहज नमवले. स्टिव्ह स्मिथ, अ‍ॅलेक्स कॅरीचा अपवाद वगळता कांगारुंच्या संघाने शरणागती पत्करली. यष्टीरक्षक-फलंदाज कॅरीने स्मिथच्या साथीने थोडाफार प्रतिकार केला. विशेष म्हणजे वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पराभवाची आपत्ती ऑस्ट्रेलियावर प्रथमच ओढावली. फिंचचा ऑस्ट्रेलियन संघ यंदा सहाव्या वर्ल्डकप जेतेपदासाठी उत्सुक होता. भारतासह ऑस्ट्रेलियाच जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. परंतु दोघांचेही आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले.

एजबॅस्टनवर वोक्स, आर्चर, वूड या तेज त्रिकूटासह आदिल रशीदच्या फिरकीपढे ऑस्ट्रेलियाचा सारा संघ २२३ धावांतच गारद झाला. ७ षटकांतच कांगारुंची अवस्था ३ बाद १४ अशी झाली होती. जोफ्रा आर्चर, क्रिस वोक्स यांच्या तेजतर्रार मार्‍यापुढे वॉर्नर, फिंच, हँन्डसकॉम्ब हे झटपट गारद झाल्यावर माजी कर्णधार स्मिथने यष्टीरक्षक कॅरीसह शतकी भागीदारी रचून डाव सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आर्चरच्या मार्‍यावर दुखापत झालेल्या कॅरीने नेटाने किल्ला लढवला. रशीदच्या फिरकीने कॅरीला (७० चेंडूत ४६) चकवले. तसेच स्टोइनिसला शून्यावर पायचीत पकडले. मॅक्सवेलने फटकेबाजीचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. अ‍ॅशेस मालिकेआधी ऑस्ट्रेलिया-इंग्लंड मुकाबला ही अ‍ॅशेसची रंगीत तालीमच. इंग्लंडच्या आर्चर, वोक्स या तेज जोडगोळीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांची भंबेरी उडाल्याचे चित्र दिसले. बार्मी आर्मीचे प्रेक्षक यामुळे निश्चितच सुखावले असतील. फिंचला तर खाते उघडण्याची संधीदेखील आर्चरने दिली नाही. धावांचा रतीब टाकणार्‍या डावखुर्‍या वॉर्नरला वोक्सने बेअरस्टोकरची झेलबाद केले ते ९ धावांवर.

- Advertisement -

२२४ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग जेसन रॉय, बेअरस्टो यांनी आरामात करताना १२४ धावांची सणसणीत सलामी इंग्लंडला करुन दिली. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, बेहरनडॉर्फ या ऑस्ट्रेलियन तेज त्रिकुटाच्या आक्रमणात ना जान होती, ना जोश! आक्रमक क्षेत्रव्यूह रचण्याची खबरदारी फिंचने घेतली नाही. रॉय, बेअरस्टो यांनी धावांची लयलूटच केली. रॉयने ५ षटकार, ९ चौकारांसह ८५ धावा तडकावल्या. जो रुट, इयॉन मॉर्गन यांनी आरामात फटकेबाजी करत इंग्लंडला ३३ व्या षटकातच विजय मिळवून दिला. महोत्सवी सामन्याच्या थाटात इंग्लंडने कांगारुंची गोलंदाजी फोडून काढली. स्टार्कने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये १० सामन्यांत २७ मोहरे टिपले, पण इंग्लिश फलंदाजांनी स्टार्कचा खरपूस समाचार घेताना त्याच्या ९ षटकांत ७० धावा चोपून काढल्या आणि बेअरस्टोची एकमेव विकेट त्याला मिळाली.

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया, भारत-न्यूझीलंड या उपांत्य लढतीत कमालीचे साम्य होते. भारताने सुरुवातीला ३ विकेट (रोहित, राहुल, विराट) झटपट गमावल्या, त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाने ३ विकेट (फिंच, वॉर्नर, हँड्सकॉम्ब) झटपट गमावल्या. भारताप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा डावही ४९ षटकांत आटोपला. भारताचा धोनी धावचीत झाला तेव्हा धावफलक होता ८ बाद २१६, तर ऑस्ट्रेलियाचा स्टिव स्मिथ धावचीत झाला तेव्हा धावफलक होता ८ बाद २१७. भारताप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या ७ फलंदाजांनी एकेरी धावसंख्या केली, तर चौघांनी दोन आकडी धावसंख्या केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -