घरक्रीडाथोडं चुकलंच...

थोडं चुकलंच…

Subscribe

विश्वचषक २०१९ मध्ये ९ पैकी ७ सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला भारत आणि दुसर्‍या स्थानी असलेला ऑस्ट्रेलिया या दोन संघांना उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. यंदाचा विश्वचषक जिंकण्यासाठी या दोन्ही संघांना प्रबळ दावेदार मानले जात होते, पण प्रत्यक्षात एकदाही विश्वचषक न जिंकलेले संघ अंतिम फेरीत विश्वविजेतेपदासाठी झुंजतील. याचे कारण दोन्ही संघातील आघाडीच्या आणि सर्वाधिक धावा करणार्‍या प्रमुख फलंदाजांना आलेले अपयश. याशिवाय फलंदाजीतील चुकलेली रणनीती आणि दडपण हाताळण्यात आलेले अपयश हेदेखील कारण म्हणता येईल.

विराटसेनेला २४० धावांचे लक्ष्य गाठण्यात अपयश आले. यात विक्रमवीर रोहित शर्मासह लोकेश राहुल आणि फलंदाजीची भिस्त असलेला कर्णधार विराट कोहलीदेखील पूर्णत: फ्लॉप ठरले. सर्वाधिक धावा आणि शतके करणारा रोहित इंग्लंडसाठी मोठी डोकेदुखी होता. त्याने ९ सामन्यांत ६४८ धावा केल्या. त्यात विराटही विजयी योगदान देणार ही सर्वच भारतीय चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात झाले उलटेच.

- Advertisement -

कांगारूंच्या बाबतीतही नेमके हेच झाले. सर्वाधिक धावा करणार्‍यांच्या यादीतील दुसर्‍या क्रमांकावरील नाव म्हणजे डेविड वॉर्नर. वॉर्नरने ६४७ धावांचे योगदान दिले होते. मात्र, रोहित आणि वॉर्नर यांना उपांत्य फेरीतील सामन्यात अनुक्रमे १ आणि ८ धावा करता आल्या. याशिवाय लोकेश राहुल (१), विराट (१), अ‍ॅरॉन फिंच (०), पीटर हॅण्डसकॉम्ब (४) यांना सपशेल अपयश आले. याउलट किवीजच्या रॉस टेलर (७४), केन विल्यमसन (६७), हेन्री निकोल्स (२८) यांसह यजमानांच्या जेसन रॉय (८५), बेअरस्टो (३४), जो रूट (४९), इयॉन मॉर्गन (४५) यांनी महत्त्वाचे योगदान देत आपल्या संघांना अंतिम सामन्यात पोहोचवले. न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी आपला सर्वोत्तम खेळ करत विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आणि आता ते पहिल्यांदाच विश्वविजेतेपदासाठी झुंजणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा एक उत्कृष्ट सामना बघण्याची संधी क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे, यात शंका नाही.

चुकांवर चर्चा
अपेक्षेनुसार दोन्ही उपांत्य सामने ’हाय स्कोरिंग’ झाले नाहीत. अर्थातच सर्व संघांवर प्रचंड दबाव होता. यात ज्याने सरस खेळ केला तो पुढे गेला आणि ज्याने चुका केल्या त्याला गाशा गुंडाळावा लागला. सामन्यानंतर प्रचंड चर्चा झाली ती दोन्ही पराभूत संघांनी केलेल्या चुकांची. यात फलंदाजीतील क्रम, खेळपट्टीवर टिकाव धरण्यात आलेले अपयश आणि जिंकण्यासाठी अपुरे पडलेले प्रयत्न हे प्रमु्ख विषय चर्चेत आहेत. याशिवाय पंचांच्या निर्णयावरही प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. भारताच्या विजयाची अंतिम आशा असलेला धोनी धावबाद झाला, त्यावरूनही अनेकांनी विविध मते व्यक्त केली. त्याला फलंदाजीत उशिराने पाठवल्याबद्दलही अनेकांनी मते मांडली. ऑस्ट्रेलियन संघाच्याही फलंदाजांनी अपेक्षित धावसंख्या न उभारल्याने त्यांच्यावरही टिकास्त्र सोडण्यात आले. सोशल मीडिया, वृत्तपत्रे, ज्येष्ठ क्रिकेटपटू, तज्ज्ञांनीही या चुकांवर प्रचंड नाराजी व्यक्त केली. यातून आता उभय संघांनी पुढील स्पर्धेत धडा घ्यावा एवढीच काय ती अपेक्षा क्रिकेटप्रेमी बाळगून आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -