घरक्रीडाफिंचचे दमदार शतक; इंग्लंडची अवस्था बिकट

फिंचचे दमदार शतक; इंग्लंडची अवस्था बिकट

Subscribe

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने विश्वचषकातील आपले उत्कृष्ट प्रदर्शन इंग्लंडविरुद्धही सुरु ठेवले. त्याच्या दमदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात ५० षटकांत ७ बाद २८५ अशी धावसंख्या उभारली. हे फिंचचे या विश्वचषकातील दुसरे शतक होते. या खेळीमुळे तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत दुसर्‍या स्थानी (४९६ धावा) पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान इंग्लंडची १५ षटकांनंतर ४ बाद ५७ अशी धावसंख्या होती.

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फिंच आणि डेविड वॉर्नर यांनी डावाची सावध सुरुवात केली. त्यामुळे १० षटकांनंतर त्यांची बिनबाद ४४ अशी धावसंख्या होती. मात्र, यानंतर त्यांनी धावांची गती वाढवल्याने १८व्या षटकात ऑस्ट्रेलियाचे शतक फलकावर लागले. पुढच्याच षटकात मोईन अलीच्या गोलंदाजीवर २ धावा काढत फिंचने ६१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या पुढच्या षटकात वॉर्नरने या स्पर्धेतील आपले तिसरे अर्धशतक झळकावले. अर्धशतक झाल्यानंतर त्याला फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. ५३ धावांवर त्याला अलीने जो रूटकरवी झेलबाद केले. त्याने आणि फिंचने पहिल्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी केली.

- Advertisement -

तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या उस्मान ख्वाजाने काही काळ चांगली फलंदाजी करत २९ चेंडूत २३ धावा केल्यानंतर स्टोक्सने त्याचा त्रिफळा उडवला. फिंचवर मात्र याचा परिणाम झाला नाही. त्याने जोफ्रा आर्चर टाकत असलेल्या ३६ व्या षटकात २ धावा काढत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे या स्पर्धेतील दुसरे आणि एकदिवसीय कारकिर्दीतील १५वे शतक होते. मात्र, पुढच्याच चेंडूवर आर्चरने फिंचला माघारी पाठवले. फिंचने ११६ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०० धावा केल्या. पुढे स्टिव्ह स्मिथ (३४ चेंडूत ३८) आणि ग्लेन मॅक्सवेल (८ चेंडूत १२) यांनी ऑस्ट्रेलियाच्या २०० धावा पूर्ण केल्या. हे दोघे बाद झाल्यावर अखेरच्या षटकांमध्ये यष्टीरक्षक-फलंदाज अ‍ॅलेक्स कॅरी २७ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ३८ धावा केल्याने ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ७ बाद २८५ अशी झाली.

याचा पाठलाग करताना इंग्लंडची अडखळती सुरुवात झाली. सलामीवीर जेम्स विन्सला जेसन बेहरनडॉर्फने खातेही उघडू दिले नाही. फॉर्मात असलेल्या रूटला अवघ्या ८ धावांवर मिचेल स्टार्कने माघारी पाठवले. कर्णधार मॉर्गनलाही चांगली करता आली नाही. स्टार्कनेच त्याला ४ धावांवर बाद केले. जॉनी बेअरस्टोने संयमाने फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला २७ धावांवर बेहरनडॉर्फने कमिन्सकरवी झेलबाद केले. त्यामुळे १५ षटकांनंतर इंग्लंडची ४ बाद ५७ अशी अवस्था होती. बेन स्टोक्स (नाबाद १३) आणि जॉस बटलर (नाबाद ३) हे फलंदाज मैदानात होते.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक-

ऑस्ट्रेलिया : ५० षटकांत ७ बाद २८५ (अ‍ॅरॉन फिंच १००, डेविड वॉर्नर ५३, स्टिव्ह स्मिथ ३८, अ‍ॅलेक्स कॅरी ३८; क्रिस वोक्स २/४६, बेन स्टोक्स १/२९) वि. इंग्लंड १५ षटकांत ४ बाद ५७ (जॉनी बेअरस्टो २७; मिचेल स्टार्क २/१२, जेसन बेहरनडॉर्फ २/२८).

फिंचचा अनोखा विक्रम

इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने शतकी खेळी केली. या खेळीमुळे त्याने एक अनोखा विक्रमही आपल्या नावे केला आहे. विश्वचषकात आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध १३ फलंदाजांनी १४ शतके लगावली असून फिंच हा एकमेव असा फलंदाज आहे, ज्याने इंग्लंडविरुद्ध २ शतके लगावली आहे. त्याने २०१५ विश्वचषकातील मेलबर्नमध्ये झालेल्या सामन्यात १३५ धावांची खेळी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -