एका षटकारापायी!

Mumbai
न्यूझीलंडविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्डवर निशमच्या गोलंदाजीवर षटकार ठोकण्याच्या नादात ब्रेथवेट लाँगऑनवरील ट्रेंट बोल्टच्या हाती झेल देऊन माघारी परतला.

बार्बाडोस म्हणजे वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी गुणवान खेळाडूंची खाण. सोबर्स, हॉल, ग्रीनिज, हेन्स, मार्शल, हॉल्फर्ड असे अनेक गुणी, अष्टपैलू खेळाडू बार्बाडोसचेच. मुंबईने जसे भारतीय क्रिकेटला खूप सारे कसोटीपटू दिले, त्याचप्रमाणे बार्बाडोसने वेस्ट इंडिज क्रिकेटला पुष्कळ कसोटीपटू मिळवून दिले. अलीकडे विंडीज क्रिकेटला उतरती कळा लागली असून, बार्बाडोसकडूनही विंडीज क्रिकेटला पूर्वीप्रमाणे क्रिकेटपटूंची रसद पुरवली जात नाही.

तीन वर्षांपूर्वी (२०१६) कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर विंडीजने इंग्लंडचा पराभव करून टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचे जेतेपद पटकावले ते बार्बाडोसच्या उंचपुर्‍या कार्लोस ब्रेथवेटच्या ४ उत्तुंग षटकारांमुळे. अखेरच्या षटकामध्ये विंडीजला विजयासाठी १९ धावांची गरज असताना ब्रेथवेटने सलग ४ षटकार लगावून विंडीजला विजय मिळवून दिला. मागील शनिवारी मात्र वर्ल्डकपमध्ये त्याला ही किमया जमली नाही. न्यूझीलंडविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्डवर निशमच्या गोलंदाजीवर षटकार ठोकण्याच्या नादात ब्रेथवेट लाँगऑनवरील ट्रेंट बोल्टच्या हाती झेल देऊन माघारी परतला. विंडीजला न्यूझीलंडविरुध्द ५ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. परिणामी त्यांच्या बाद फेरीतील प्रवेशाच्या आशाही संपुष्टात आल्या.

७ बाद १६४, ८ बाद २११, ९ बाद २४५ अशा स्थितीतून ब्रेथवेटने तळाच्या फलंदाजांच्या साथीने आपले शतक साजरे करताना विंडीज विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. अखेरच्या तीन षटकांत ३३ धावांची गरज असताना ब्रेथवेटने लाँगऑन, एक्स्ट्रा कव्हर या पट्ट्यात उंचावरून टोलेबाजी करत षटकार खेचले. त्याने २, ६, ६, ६, ४, १ अशी टोलेबाजी करत मॅट हेन्रीच्या एका षटकात २५ धावा वसूल केल्या.

ओल्ड ट्रॅफर्डवर न्यूझीलंडविरुध्दच्या सामन्यात ब्रेथवेट फलंदाजीला उतरला, तेव्हा ४ बाद १४२ अशी विंडीजची अवस्था होती. तो बाद झाला तेव्हा विंडीजचा डाव २८६ धावांंवर संपुष्टात आला. शेवटच्या १४४ पैकी १०१ धावा तर ब्रेथवेटच्याच! ८६ चेंडून त्याने वनडेतील आपले पहिलेवहिले शतक झळकावले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने ४९व्या षटकासाठी चेंडू निशमच्या हाती सोपवला. याच षटकात ब्रेथवेटने दोन धावा घेत आपले शतक साजरे केले. अखेरच्या चेंडूवर षटकार फटकावण्याचा मोह त्याला आवरला नाही. लाँगऑनवरील बोल्टने धावत येऊन सुरेख झेल टिपला आणि न्यूझीलंडने विंडीजवर ५ धावांनी सनसनाटी विजय मिळवून ११ गुणांसह गुणतक्त्यात अव्वल स्थानावर झेप घेतली.

बार्बाडोसच्या ब्रेथवेटची प्रतिमा आहे टी-२० क्रिकेटपटूची! वनडेच्या तुलनेत त्याची टी-२० क्रिकेटमधील कामगिरी उजवी आहे. आयपीएलमध्ये त्याच्यावर ४ कोटींची बोली लागली. तेव्हापासून टी-२० क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याचे नाव गाजू लागले. ऑस्ट्रेलियाविरुध्द कसोटी पदार्पणात त्याने मेलबर्न, सिडनी कसोटीत अर्धशतके फटकावली. मात्र, त्याच्या कसोटी कारकिर्दीला खीळ बसली आणि टी-२०, वनडे यातच त्याची कारकिर्द बहरली. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने विंडीज संघाचे कर्णधारपद भूषविले आहे. विंडीज क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडू म्हणून नावारूपाला येण्याची क्षमता ब्रेथवेटमध्ये निश्चितच आहे. वर्ल्डकपमधील शतकी खेळी नंतर त्याची क्रिकेट कारकीर्द बहरेल, अशी आशा आहे.