घरक्रीडाती मजा नाही रे भाऊ !

ती मजा नाही रे भाऊ !

Subscribe

वर्ल्डकपमध्ये थरारक सामन्यांची कमतरता

क्रिकेट वर्ल्डकप सुरू होऊन आता ३ आठवडे झाले आहेत. मात्र, ही स्पर्धा म्हणावी तशी अजून रंगात आलेली नाही. इंग्लंडमधील लहरी वातावरणाबरोबरच भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यजमान इंग्लंड या चौकडीचे इतर संघांवरील वर्चस्व याला कारणीभूत आहे, असे म्हणायला हरकत नाही. घरच्या मैदानावर होत असलेला हा वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार असणार्‍या इंग्लंडने २ सामने गमावले आहेत. त्यांना पाकिस्तान आणि श्रीलंका या आशियाई संघांनी पराभूत केले. मात्र, त्यांनी ४ सामने मोठ्या फरकाने जिंकले आहेत.

ऑस्ट्रेलियाचा केवळ एका सामन्यात पराभव झाला असून, तो भारताविरुद्ध झाला होता. भारत आणि न्यूझीलंड हे संघ अजूनही (शनिवारच्या सामन्यांपूर्वी) अपराजित आहेत. त्यांनी जवळपास सर्वच सामने अगदी सहजपणे जिंकल्याने हे चार संघ आणि इतर सहा संघांमधील तफावत प्रकर्षाने जाणवत आहे.

- Advertisement -

‘हा वर्ल्डकप पाहताना मजा येत नाही, कारण जवळपास सर्वच सामने एकतर्फी होत आहेत’, असे काही दिवसांपूर्वीच इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन म्हणाला. हा वर्ल्डकप चुरशीचा होण्यासाठी आयसीसीने केवळ अव्वल दहा संघांना यामध्ये सहभागी केले. मात्र, सध्या तरी त्यांच्या आणि चाहत्यांच्या अपेक्षेनुसार ही स्पर्धा झालेली नाही. या स्पर्धेत संघांनी प्रथम फलंदाजी करताना ११ वेळा ३०० पेक्षा अधिक धावसंख्या उभारली आहे आणि केवळ बांगलादेशने ३०० हून अधिक धावांचे आव्हान यशस्वीरीत्या पार केले आहे. मात्र, हा सामनाही चुरशीचा झाला नाही. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना ३२१ धावा केल्या होत्या, ज्या बांगलादेशने अवघ्या ४१.३ षटकांत पूर्ण केल्या.

या वर्ल्डकपमधील सर्वात रोमांचक सामन्यासाठी तीन आठवडे वाट पहावी लागली. मागील बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना हा अखेरच्या षटकात संपणारा हा या स्पर्धेतील पहिला सामना होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २४१ धावा केल्या. न्यूझीलंडला हे लक्ष्य गाठण्यासाठी चांगलेच झुंजावे लागले. त्यांना हा सामना जिंकण्यासाठी अखेरच्या षटकात ८ धावांची गरज असताना कर्णधार केन विल्यमसनने षटकार आणि चौकार लगावत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.

- Advertisement -

दक्षिण आफ्रिकेचा हा या स्पर्धेतील चौथा पराभव होता. त्यांनी चारही सामने मोठ्या फरकाने गमावले आहेत. हा संघ भारत आणि इंग्लंडला जेतेपदासाठी कडवी झुंज देईल अशी अपेक्षा होती, पण आता तसे होणे अवघड वाटत आहे. या सामन्याआधी सर्वात रंगतदार सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झाला होता. मात्र, तो सामना पाकिस्तानने १४ धावांनी जिंकला होता. तसेच ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा १५ धावांनी पराभव केला होता.

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. मात्र, या स्पर्धेत एखाद्या संघाने मोठी धावसंख्या उभारली, तर तो संघ सहज सामने जिंकताना पहायला मिळते आहे. तसेच एखाद्या संघाने अडीचशेपेक्षा कमी धावसंख्या केली, तर संघ सहज पराभूत होत आहे. त्यामुळे या स्पर्धेला थरारक सामन्यांची गरज आहे. आगामी काळात भारत-इंग्लंड, इंग्लंड-ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांमध्ये सामने होणार आहेत. तसेच इतर संघही उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे वर्ल्डकपचे पुढील सामने तरी चुरशीचे होतील, अशी आशा चाहते करत असतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -