घरक्रीडायंग ब्रिगेडचा अचूक ‘वेध’!

यंग ब्रिगेडचा अचूक ‘वेध’!

Subscribe

२०१२ मध्ये भारतीय नेमबाजी संघटनेने ज्युनियर आणि युवा नेमबाजांसाठी विशेष कार्यक्रम राबवल्यामुळे सौरभ चौधरी, मनू भाकर, अंजूम मुद्गिल यांसारख्या युवा नेमबाजांची झपाट्याने प्रगती झाली. खासकरून सौरभ आणि मनू या युवा नेमबाजांची कामगिरी उल्लेखनीय आहे. युवा नेमबाजांनी यंदाच्या चार वर्ल्डकपमध्ये मिळून एकूण २२ पदके पटकावली आहेत, ज्यात १६ सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या वर्ल्डकप अंतिम स्पर्धेत भारताकडून मनू भाकर, एलावेनिल वालारिवन आणि दिव्यांश सिंह पन्वर या तिघांनी वैयक्तिक प्रकारांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. मनू आणि दिव्यांश यांनी या स्पर्धेआधीच ऑलिम्पिक कोटा मिळवला होता.

भारतामध्ये क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांना फारसे महत्त्व दिले जात नाही. भारताने क्रिकेटमध्ये वर्षानुवर्षे दमदार कामगिरी करत जागतिक पातळीवर वेगळा ठसा उमटवला आहे. मात्र, मागील काही वर्षांत इतर खेळांतील भारतीय खेळाडूही आपली वेगळी ओळख बनवताना पाहायला मिळाले आहेत. सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू, किदाम्बी श्रीकांतसारखे बॅडमिंटनपटू, बजरंग पुनिया, सुशील कुमार यांसारखे कुस्तीपटू यांनी भारताचे नाव क्रीडाक्षेत्रात मानाने उंचावले आहे. परंतु, मागील एक-दोन वर्षांत क्रिकेट सोडता भारत कोणत्या एका खेळात यशस्वी होत आहे, असा प्रश्न विचारला असता, नेमबाजी हे उत्तर मिळाल्यास आश्चर्य वाटू नये.

नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारतीयांनी २०१८ पर्यंत ३३ वर्षांत रायफल आणि पिस्तूल प्रकारात केवळ १२ सुवर्णपदके जिंकली होती. मात्र, फक्त २०१९ मध्ये भारतीय नेमबाजांच्या नावे १६ सुवर्णपदकांची नोंद आहे. यावरूनच भारतीय नेमबाजांच चढता आलेख लक्षात येतो. या नेमबाजांना जसपाल राणा आणि दीपाली देशपांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणार्‍या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांकडून पदकांची अपेक्षा बाळगली जात आहे. भारताचे क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनीसुद्धा ’भारतीय नेमबाजांना ऑलिम्पिकमध्ये पदक न मिळाल्यास आश्चर्य वाटेल’ असे बोलून दाखवले आहे.

- Advertisement -

२०१२ मध्ये भारतीय नेमबाजी संघटनेने ज्युनियर आणि युवा नेमबाजांसाठी विशेष कार्यक्रम राबवल्यामुळे सौरभ चौधरी, मनू भाकर, अंजूम मुद्गिल यांसारख्या युवा नेमबाजांची झपाट्याने प्रगती झाली. खासकरून सौरभ आणि मनू या युवा नेमबाजांची कामगिरी उल्लेखनीय आहे. युवा नेमबाजांनी यंदाच्या चार वर्ल्डकपमध्ये मिळून एकूण २२ पदके पटकावली आहेत, ज्यात १६ सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या वर्ल्डकप अंतिम स्पर्धेत भारताकडून मनू भाकर, एलावेनिल वालारिवन आणि दिव्यांश सिंह पन्वर या तिघांनी वैयक्तिक प्रकारांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. मनू आणि दिव्यांश यांनी या स्पर्धेआधीच ऑलिम्पिक कोटा मिळवला होता.

आतापर्यंत भारताच्या १५ नेमबाजांनी टोकियो ऑलिम्पिकमधील आपला प्रवेश निश्चित केला आहे. ही भारतीय नेमबाजांची सर्वोत्तम कामगिरी ठरली. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचे ११ नेमबाज, तर २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे १२ नेमबाज सहभागी झाले होते. ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारताने एकूण २८ पदके जिंकली असून त्यापैकी चार पदके नेमबाजीत मिळाली आहेत. २००४ मध्ये राज्यवर्धन सिंह राठोड यांनी पुरुष डबल ट्रॅप प्रकारात रौप्यपदकासह भारताला नेमबाजीतील पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले होते. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये गगन नारंग (कांस्य) आणि विजय कुमार (रौप्य) यांनी दोन पदके भारताच्या पदरात टाकली. मात्र, भारतीय नेमबाजीतील अविस्मरणीय क्षण २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये आला. अभिनव बिंद्राने पुरुष १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, जे भारताचे ऑलिम्पिकमधील नेमबाजीतील पहिले आणि एकमेव सुवर्णपदक! मात्र, पुढील वर्षी भारतीय नेमबाजांना यात बदल करणार्‍याची एक संधी मिळेल.

- Advertisement -

टोकियो ऑलिम्पिकमध्ये विशेषतः सौरभ चौधरी (पुरुष १०मीटर एअर पिस्तूल) आणि मनू भाकर (महिला १० मीटर एअर पिस्तूल) या १७ वर्षीय नेमबाजांकडून पदकाची अपेक्षा केली जात आहे. २०१८ नेमबाजी वर्ल्डकपमध्ये मनूने दोन सुवर्णपदके जिंकली होती. वर्ल्डकपमध्ये पदक मिळवणारी ती सर्वात युवा भारतीय नेमबाज आहे. त्यानंतरही तिने आपला धडाका कायम ठेवताना आशियाई नेमबाजी स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा आणि युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदके पटकावण्याची किमया साधली आहे. दुसरीकडे २०१८ एशियाडमध्ये सुवर्णपदक मिळवत प्रकाशझोतात येणार्‍या सौरभने वर्ल्डकपमध्ये ६ सुवर्ण, युवा ऑलिम्पिक स्पर्धेत १ सुवर्ण, तर आशियाई नेमबाजी स्पर्धेत दोन रौप्यपदके पटकावली आहेत. त्यामुळेच ऑलिम्पिकमध्ये या दोघांच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे.

त्याचप्रमाणे १० मीटर एअर रायफल नेमबाजी प्रकारात महिलांच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असल्यामुळे अपूर्वी चंडेलाकडूनही पदकाची अपेक्षा केली जात आहे. तिने यंदा वर्ल्डकपमध्ये स्पर्धांत तीन सुवर्णपदके पटकावली आहेत. त्यातच ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा अनुभवही तिच्या गाठीशी आहे. २०१६ ऑलिम्पिकमध्ये अपूर्वीवर पात्रता फेरीतच गारद होण्याची नामुष्की ओढवली होती. मात्र, टोकियो ऑलिम्पिकमध्ये यात बदल करण्याचा तिचा निर्धार असेल. या युवकांप्रमाणेच महाराष्ट्राच्या अनुभवी नेमबाजराही सरनोबत आणि तेजस्विनी सावंत कशी कामगिरी करतात हे पाहणे औसूक्त्याचे ठरेल. एकूणच नेमबाजांच्या मागील एक-दोन वर्षांतील कामगिरीचा आढावा घेतल्यास टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताला नेमबाजीत पदके मिळतील अशी आशा बाळगता येऊ शकते.

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले भारतीय नेमबाज

१) अंजुम मुद्गिल (महिला १० मीटर एअर रायफल)
२) अपूर्वी चंडेला (महिला १० मीटर एअर रायफल)
३) दिव्यांश सिंह पन्वर (पुरुष १० मीटर एअर रायफल)
४) दीपक कुमार (पुरुष १० मीटर एअर रायफल)
५) तेजस्विनी सावंत (महिला ५० मीटर रायफल थ्री पोजिशन)
६) संजीव राजपूत (पुरुष ५० मीटर रायफल थ्री पोजिशन)
७) ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर (पुरुष ५० मीटर रायफल थ्री पोजिशन)
८) मनू भाकर (महिला १० मीटर एअर पिस्तूल)
९) यशस्विनी सिंह देसवाल (महिला १० मीटर एअर पिस्तूल)
१०) सौरभ चौधरी (पुरुष १० मीटर एअर पिस्तूल)
११) अभिषेक वर्मा (पुरुष १० मीटर एअर पिस्तूल)
१२) राही सरनोबत (महिला २५ मीटर पिस्तूल)
१३) चिंकी यादव (महिला २५ मीटर पिस्तूल)
१४) अंगद वीर सिंग बाजवा (पुरुष स्कीट)
१५) मैराज अहमद खान (पुरुष स्कीट)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -