सोशल मीडिया युजर्सना दिलासा; सर्व्हर सुरळीत; फेसबुकचा माफीनामा

Mumbai
facebook
प्रातिनिधिक फोटो

बुधवारी फेसबुक, व्हॉटस्‌अप आणि इन्टाग्राम या सोशल नेटवर्कींग साईटस्‌ आणि ॲपमध्ये अडथळे निर्माण झाले होते. मात्र आज गुरूवारी युजर्ससाठी चांगली बातमी असून या सर्व्हर दुरूस्त झाल्याने या सेवा पूर्ववत झाल्याची माहिती फेसबुकने आज सकाळी दिली आहे.

ट्विटर, फेसबुक, व्हॉटस्अप, इन्टाग्रामचे सर्व्हर दुरूस्त झाले आहेत. फेसबुकने आज सकाळी ट्विट करून ही माहिती दिली. आमच्या ॲप्लीकेशन आणि सर्व वेबसाईटस्‌वर वापरकर्त्यांना फोटो व व्हिडिओ पाठविताना अडचणी येत होत्या. आता सर्वकाही सुरळीत झाले असून आम्ही याप्रकरणी वापरकर्त्यांची माफी मागतो, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

ट्विटरनेसुद्धा ट्विट करून समस्या सुटल्याची माहिती दिली आहे. वापरकर्त्यांनी तोपर्यंत जो संयम दाखविला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

बुधवारी रात्री फेसबुक, व्हॉटस्‌अप, इन्स्टाग्राम आणि ट्विटरच्या वापरकर्त्यांना लॉगीन करणे, पोस्ट शेअर करणे आणि फोटो डाऊनलोड व अपलोड करण्यात अडचणी येत होत्या. भारतासह, युरोप आणि अमेरिकेतील वापरकर्त्यांनीही याबद्दल तक्रारी केल्या होत्या. व्हॉटस्‌अप वरून फोटो डाऊनलोड करताना ‘हा फोटो तुम्हालाच पाठवला किंवा कसे याची खात्री करा’ असा संदेश वाचायला मिळत होता.