पबजी मोबाईल लाइटचे भारतात अनावरण

Mumbai
PUBG

पबजी मोबाईल या लोकप्रिय खेळाच्या वेगवान व हलक्या आवृत्तीचे अनावरण भारतात करण्यात आले. गूगल प्ले स्टोअरवर खेळण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी हा खेळ उपलब्ध आहे. पबजी मोबइलची गगनाला भिडणारी लोकप्रियता बघून अधिकाधिक उपकरणांवर खेळता येईल, अशा प्रकारे विकासकांनी पबजी मोबाईल लाइटची रचना केली आहे. कुठल्याही वेळी, कुठेही आणि कुठल्याही उपकरणावर खेळता यावा, ही यामागची संकल्पना असून या खेळाच्या सर्व फॅन्सना विनाअडथळा या खेळाचा आनंद लुटता यावा, यासाठी कमी क्षमतेचा रॅम असलेल्या स्वस्त श्रेणीतील स्मार्ट फोन्सवरही खेळता येण्याच्या दृष्टीने या खेळाची रचना करण्यात आली आहे.

अनरिअल इंजिन ४ सह या आवृत्तीची रचना करण्यात आली असून अधिकाधिक उपकरणांवर हा खेळ खेळणे शक्य होणार आहे. जगभरातील लक्षावधी चाहत्यांना आकर्षित करणार्‍या या खेळाचा अनुभव घेताना कुठल्याही प्रकारची तडजोड करावी लागणार नाही, यासाठी कमी क्षमतेचा रॅम असलेल्या उपकरणांवरही तो खेळता यावा, अशा प्रकारे या खेळाची रचना करण्यात आली आहे. पबजी मोबाईल लाइटमध्ये ६० खेळाडूंसाठी लहान नकाशा असून त्यामुळे पारंपरिक पबजीची शैली कायम ठेवताना १० मिनिटांपर्यंत चालणारा वेगवान खेळ खेळण्याचा आनंद खेळाडूंना मिळेल. अवघ्या ४०० एमबीचा इन्स्टॉलेशन पॅक आणि २ जीबी रॅमपेक्षा कमी क्षमता असलेल्या उपकरणांवरही विनाअडथळा चालेल, अशा दृष्टीने केलेली खेळाची रचना यामुळे या आवृत्तीच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या खेळाडूंना खेळाचा आनंद लुटता येणार आहे.