घरटेक-वेक'स्मार्ट' बँडेज: बनणार तुमचा फॅमिली डॉक्टर!

‘स्मार्ट’ बँडेज: बनणार तुमचा फॅमिली डॉक्टर!

Subscribe

अमेरिकन संशोधकांनी एक स्मार्ट बँडेज तयार केलं आहे. हे खास बँडेज तुमच्या शरीरातील जखमांचा सखोल अभ्यास करुन त्या कधी भरतील आणि त्या भरण्यासाठी काय औषधोपचार करावे लागतील याची माहिती देईल. मधुमेहींसाठी देखील हे बँडेज लाभदायक ठरेल.

शास्त्रज्ञांनी नुकताच एका स्मार्ट ‘बँडेज’ चा शोध लावला आहे. आपण जखमेवर लावत असलेल्या साधारण बँडेजपेक्षा हे बँडेज खूपच खास आहे. हे बँडेज केवळ तुमची जखम बरी करणार नाहीये तर तुमच्या जुन्या जखमेचीही काळजी घेऊ शकणार आहे. इतकंच नाही तर तुम्हाला झालेल्या जखमेचं गाभीर्य लक्षात घेऊन त्यासाठी लागणाऱ्या औषधाची मात्रा देखील हे बँडेज सांगणार आहे. या अत्याधुनिक बँडे़जमुळे तुमच्या शरीरावर झालेल्या बाह्य किंवा आंतरिक जखमांची अंतर्गत काळजी घेतली जाणार आहे आणि ते ही या जखमा न पाहता. थोडक्यात हे बँडेज तुमच्या शरीरातील जखमांचा सखोल अभ्यास करुन त्या कधी भरतील आणि त्या जखमा भरण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील हे तुम्हाला सांगेल.

मोबाईलला होणार कनेक्ट

अमेरिकेच्या टफ्ट्स युनिव्हर्सीटीमधील शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या या आधुनिक बँडेजमध्ये एक खास मायक्रोप्रोसेसर आणि सेंसर बसवण्यात आला आहेत. बँडेजमधील छोटासा मायक्रोप्रोसेसर तुमच्या जखमेचं संपूर्ण विश्लेषण करेल. तुमच्या जखमेची खोली किती आहे, किती रक्तस्त्राव झाला आहे, त्याचं तापमान किती आहे याची तुम्हाला तपशीलवार माहिती देईल. तसंच ती जखम बरी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, तसंच कोणत्या प्रकारची औषधं त्या जखमेवर लावण्याची गरज आहे आणि किती प्रमाणात ते औषध लावणं अपेक्षित आहे याची सविस्तर माहिती हे बँडेज तुम्हाला देईल. बँडेजमधील मायक्रोप्रोसेर तुम्ही एका अॅपद्वारे तुमच्या मोबाईलला कनेक्ट करु शकता. जेणेकरुन ही सगळी माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहील.

- Advertisement -
smart bandage
प्रातिनिधिक फोटो

मधुमेहींसाठी विशेष फायदेशीर

रिसर्च टीमच्या म्हणण्यानुसार त्यांनी विविध प्रकारच्या जखमांवर आणि घावांवर या बँडेजची यशस्वी चाचणी करुन पाहिली आहे. यातून त्यांनी काढलेल्या निष्कर्षानुसार भाजल्यामुळे किंवा जळल्यामुळे झालेल्या जखमांवर हे बँडेज अधिक फायदेशीर ठरेल. तसंच मधुमेहींसाठी देखील हे बँडेज लाभदायक ठरेल. मधुमेह झालेल्या व्यक्तींच्या जखमा सांभाळणं खूप नाजूक असतं. या जखमा चिघळण्याची दाट शक्यता असते. मात्र, या खास बँडेजच्या माध्यमातून डायबेटिक पेशंटच्या जखमांचं निरिक्षण करणं आणि त्यावर योग्य वेळेत योग्य त्या उपाययोजना करणं सोपं जाणार असल्याचं, शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

smart bandage image
प्रातिनिधिक फोटो

सर्वसामान्यांना परवडणारं बँडेज?

‘जरनल स्मॉल’ नावाच्या एका मासिकामध्ये या शोधाविषयी सविस्तर माहिती छापून आली आहे. या रिसर्चचे प्रमुख प्रोफेसर समीर सोनकुसले यांच्या म्हणण्यानुसार, ‘हे बँडेज पूर्णपणे पारदर्शक असेल. विशेष म्हणजे यामध्ये बसवण्यात आलेला मायक्रोप्रोसेसर कमी किमतीच्या उपकरणांनी तयार केला आहे. त्यामुळे या बँडेजची किंमत लोकांना परवडेल अशीच असेल”. याशिवाय बँडेजमधील मायक्रोप्रोसेसर एकदा वापरल्यावर पुन्हा वापरता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -