आपलं महानगर विशेष: असे होतात सायबर क्राईम

Mumbai
Cyber Crime
सायबर क्राईम

मुंबईसह देशभरात सध्या ऑनलाइन व्यवहाराला चालना मिळाली आहे. ही चालना मिळाली असली तरी सध्या हॅकिंगपासून ते क्रार्ड क्रोनिंगपर्यंत अनेक माध्यमातून लोकांची फसवणूक होत आहेत. ही फसवणूक थांबविणे ही काळाची गरज असून सायबर क्राईम हे पोलिसांसाठी देखील डोकेदुखी ठरत आहेत. व्हिडीओ कॉलपासून ते तुमच्या ऑनलाइन व्यवहारावर देखील तिसर्‍याची नजर असते. त्यामुळे सध्या सुरक्षित ऑनलाइन व्यवहार कसे करावे यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरु झाले आहेत. मुळात आपली फसवणूक झाली आहे, हेच लोकांच्या फार कमी लक्षात येते, त्यामुळे सायबर क्राईम म्हणजे नेमकं काय त्यातून कसे वाचावे यासाठी आपलं महानगरने यंदाच्या नजर महानगरनच्या माध्यामातून घेतलेला हा आढावा.

सायबर गुन्ह्याचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढत चालेल आहे. सायबर गुन्हेगारांनी सामान्यांनाच नाहीतर कॉर्पोरेट क्षेत्रालाही आपले लक्ष बनवले आहे. या गुन्हेगाराच्या जाळ्यात गोरगरीब, नोकरदार, व्यवसायिक अगदी डॉक्टर, वकील देखील भरडले जात आहे. आर्थिक नुकसान करणारा आणि नागरिकांनी मेहनतीने कमावलेले पैसे नकळत गायब करणारे हे सायबर गुन्ह्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सायबर गुन्हेगारांनी सर्वच क्षेत्रात शिरकाव केलेला दिसून येत असून या गुन्ह्यांमुळे अनेक जण देशोधडीला लागले असून अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे. सायबर गुन्हेगार हा केवळ देशाच्या बाहेरूनच नाही तर देशात खेड्यापाड्यात बसून गुन्हे करीत असल्याचे समोर आले आहे. डिजिटल इंडिया मुळे जास्तीत जास्त आर्थिक व्यवहार हे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ऑनलाईन बँकिंग, तसेच आर्थिक व्यवहार करण्यासाठी स्मार्ट फोनमध्ये अनेक अँप्स आलेले आहेत जसे गूगल पे, पेटीएम, भीम अ‍ॅप याप्रकारच्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून नोकरदार, व्यवसायिक, लहान मोठे दुकानदार हे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करतात दिसून येतात.

मात्र या ऑनलाईन व्यवहाराच्या नादी लागून अनेकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. सायबर गुन्हेगारी हि एक मोठी जागतिक समस्याच बनली आहे, सर्वात महत्वाचे म्हणजे सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात सहजपणे अडकण्याचे महिलांचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेलाच धोका निर्माण झाला आहे. अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्याचा सामना करण्यासाठी कठोर कायदे करणार्‍या मोजक्याच देशांमध्ये भारताचा समावेश आहे. भारतात सायबर गुन्ह्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 साली करण्यात आला आहे. केंद्र सरकारने कायद्या जरी लागू केला असला तरी आज सायबर गुन्हेगारीला पूर्णविराम मिळण्यासाठी पोलिसांची टीम देखील उभारली असून त्यांच्यासमोर देखील सायबर गुन्हेगारी आता प्रमुख आवाहन बनले आहे. यासाठी मुळात जनजागृती गरज असल्याचे मत पोलिसांकडून देखील वयक्त करण्यात आले आहे.

कशी होती सायबर गुन्हेगारी

डेटा चोरी
डेटा चोरी करणे, या प्रकारात सायबर गुन्हेगार अथवा हॅकर एखाद्या संगणकातील माहिती पेनड्राईव्ह, डेटा बँक, सीडीचा वापर करून चोरतो. या माहितीचा गैरवापर करून ती विकली जाते. डेटा चोरी करून त्याची विक्री करण्याचा सर्वाधिक प्रकार हा कॉर्पोरेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत असतात.

सायबर स्टॉकिंग
सायब स्टॅकिंग यामध्ये ई-मेल,फेसबुक, सोशल मीडिया द्वारा चॅटिंग वा सर्फिंगच्या माध्यमातून गुन्हेगार आपली संगणकीय ओळख (आय.डी.), पासवर्ड हॅक करतात. विशिष्ट व्हायरस आपल्या संगणकात डाऊनलोडसाठी पाठवून आपली संपूर्ण वैयक्तिक माहिती, संगणकावर केल्या जाणार्या सर्व क्रिया, बँक अकाऊंट नंबर, पासवर्ड चोरी केल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.

हॅकिंग
हॅकिंग- इंटरनेच्या माध्यमातून एखादी वेबसाईड, ईमेल खाते, फेसबुक खाते यामध्ये अनधिकृत प्रवेश मिळवला जातो, त्याला हॅकिंग म्हणतात. एखाद्या ई-मेलद्वारे व्हायरसची एक्झिक्युटेबल फाईल पाठवून दुसर्या संगणकात डाऊनलोड करून हॅकिंगद्वारा अनधिकृत प्रवेश केला जातो. एखाद्या कंपनीचा अथवा कंपनीतील महत्वाच्या व्यक्तीचा ईमेल हॅक करून त्याच्या ईमेलआयडीचा वापर करून बोगस ईमेल तयार करून कंपन्यांची आर्थिक कोंडी केली जाते किंवा बोगस बँक खाते क्रमांक देऊन त्या खात्यावर पैसे मागवली जाते.

ऑनलाइन बॅकिंग
भारतात सर्वसामान्यापासून अगदी उद्योगपतीपर्यंत प्रत्येकाचे कुठल्यान कुठल्या बँकेत खाते आहे. बँकेशी आर्थिक व्यवहार करण्यासाठी ऑनलाईन बँकिंग, क्रेडिड ,डेबिट कार्ड बँकेने उपलब्द करून दिलेले आहे. अनेक जण आर्थिक व्यहारासाठी ऑनलाईन बँकिंग अथवा क्रेडिड, डेबिट कार्डाचा वापर करतात. काही वेळा अनेकांच्या मोबाईल फोनवर कॉल येतात कॉल करणारी व्यक्ती स्वतःला बँकेतून बोलत असल्याचे सांगून तुमचे क्रेडिट, डेबिट कार्ड बंद होणार असल्याचे तुमच्याकडून कार्डावरील 16 अंकी क्रमांक मागतात, त्याच बरोबर कार्डच्या मागे असलेला तीन अंकी क्रमांक घेऊन तुमच्या मोबाईलवर येणार ओटीपी क्रमांक घेऊन तुमच्या खात्यातील पैसे दुसर्‍या खात्यात वळवते केले जाते. बँक आणि पोलिसांकडून याबाबत लोकांमध्ये जनजागृती केल्यामुळे या गुन्ह्याचे प्रमाण सध्या कमी झालेले आहे.

ऑनलाईन मार्केटिंग
ओएलएक्स अथवा क्विकर या सारख्या ऑनलाईन वेबसाइडवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या जुन्या नव्या वस्तू विकत घेत असताना बरेच ग्राहकाची फसवणूक होते. कमी किमतीत मिळणार्‍या वस्तू कडे ग्राहक आकर्षित होतो, आणि तिकडेच तो सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकून त्या वस्तूसाठी त्याच्याकडून चारपटीने किंमत घेतली जाते. सध्या सायबर गुन्हेगार ऑनलाईन मार्केटिंग कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात वळले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात नागरिकांची फसवणूक होत आहे.

गुगल सर्च
बर्‍याच वेळा आपण काही शोधायचे असल्यास गुगल सर्च इंजिनचा वापर करतो. यात देखील सायबर गुन्हेगारानी शिरकाव केल्याचे अनेक घटनामध्ये उघडकीस आलेले आहे. गुगल सर्चवर एखाद्या ऑनलाईन शॉपिंग कंपनीचा ग्राहक सेवा केंद्राचा संपर्क क्रमांक शोधताना त्यानं ठिकाणी एक मोबाईल क्रमांक असतो. बरेच जण खात्री न करता या क्रमांकावर फोन करतात आणि त्यात ते फसले जाऊन त्यांची आर्थिक फसवणूक होते अश्या अनेक घटना घडलेल्या असून त्यांच्या तक्रारी देखील संबंधित पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

पेटीएम, गुगल पे
पेटीएम, आणि गुगल पे या अप्स द्वारे पैसे पाठवणे मोबाईल रिचार्ज करणे, वस्तू खरेदी करणे या सर्वासाठी हे अप्स वापरले जाते. यातही अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. साकीनाका येथे एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये गुगल पे वरून 145 रुपयांचा रिचार्ज टाकला. परंतु रिचार्ज न आल्यामुळे त्याने ग्राहक सेवा केंद्राला फोन करून कळवले ,आम्ही तुमचे गेली पसे तुमच्या खात्यात वळते करतो असे सांगून त्या व्यक्तीचे बँक डिटेल्स घेतले. काही वेळाने त्या व्यक्तीच्या खात्यातून 45 हजार रुपये गेल्याचे समजले. या प्रकारे सायबर गुन्हेगार सामन्याची फसवणूक करीत आहे.

राज्यात 2018 मध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत 3713 गुन्ह्याची नोंद असून त्यापैकी 1467 आरोपीना अटक झाली आहे.

2018 पर्यंत झालेलया गुन्ह्याची आकडेवारी
• फसवणुकीचे प्रकार – गुन्हे 1826उकल 265 आरोपी 466
• माहिती तंत्रज्ञान कायदाअंतर्गत गुन्हे -736 उकल 234 आरोपी 217
• लॉटरी जुगार कॉपिराईट गुन्हे -94 उकल 52 आरोपी 92
• क्रेडिट /डेबिट कार्ड गुन्हे – 446 उकल 23 आरोपी 25
• ऑनलाईन बँकिंग गुन्हे – 1096 उकल 128 आरोपी 262
• ओटीपी गुन्हे – 160 उकल 10 आरोपी 07

ऑनलाइन बँकिंग व्यवहार करताना लक्षात ठेवा.
देशात सर्वांत जास्त आर्थिक व्यवहार ऑनलाइन बँकिंग क्षेत्रात होत असतात. तसेच ऑनलाइन खरेदीचे प्रमाणही जास्त आहे. पुढे दिलेले काही मुद्दे ऑनलाइन बँकिंग व्यवहार करताना लक्षात ठेवा. फिशिंग हे सर्वज्ञात झाले आहे. कारण हल्ली सर्वच जण ऑनलाइन बँकिंग वापरतात. फिशिंग म्हणजे तुमच्या बँकेच्या वेबसाइटसारखी दिसणारी दुसरी बँक अथवा तुमचीच बँक आहे अशी भासवणारी वेबसाइटची लिंक ई-मेलच्या माध्यमातून पाठवली जाते. त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या बँक खात्याची माहिती मागितली जाते आणि पुढे आपल्या खात्यातील रक्कम लंपास केली जाते. ‘फिशिंग’पासून बचाव करण्यासाठी तुमचा इंटरनेट ब्राउझर (गुगल क्रोम, सफारी, इंटरनेट एक्सप्लोरर इत्यादी) हा नेहमी ‘इन कॉग्निटो मोड’मध्ये उघडा.

तुमच्या ब्राउझरमध्ये जो बुकमार्क असतो, त्यात तुमच्या बँकेची वेबसाइट सेव्ह करून ठेवा. प्रत्येक वेळा ती वेबसाइट ओपन केल्यावर त्यावर हीींिीं आणि त्याच्या डावीकडे कुलपाचे चिन्ह दिसत आहे का ते पहावे. बँक कधीही तुमची वैयक्तिक माहिती मागत नाही आणि जर कधी मागितली तर ती देताना शंभर वेळा विचार करा. संशय आल्यास आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन चौकशी करा.

मोबाइल फोन बँकिंग करताना जोपर्यंत तुम्ही तंत्रज्ञानाशी सुसंगत होत नाही, तुम्हाला आत्मविश्वास येत नाही, तोपर्यंत फोन बँकिंग टाळावे. तंत्रज्ञानाशी संबंधित विविध प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती होत नाही, तोपर्यंत मोबाइलवर येणारे बँकांचे सर्व कॉल्स टाळावे. जो मोबाइल तुम्ही वापरता तो घरातील इतरही व्यक्ती वापरत असतील, तर मोबाइल बँकिंगचे अ‍ॅप डाउनलोडही करू नका. एकूणच मोबाइल बँकिंग पूर्णपणे टाळा.

सायबर गुन्हे समाज जागृत नसल्यामुळे होत असतात. एकदा का समाजामध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता आली, तर सायबर सुरक्षित समाजाची रचना होऊ शकते. प्रत्येक एका घरात, कुटुंबात सायबर सुरक्षिततेबाबत माहिती जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली, तर सायबर गुन्ह्यांपासून आपल्याला जपता येईल. सायबर गुन्हे घडण्यापासून आपण संपूर्णपणे वाचू शकतो. तुम्हाला जी माहिती मिळेल ती तुम्ही पाच जणांना तरी सांगा. हे केल्याने सायबर सुरक्षित माणसांची साखळी निर्माण होईल. ही साखळीच तुम्हाला, मला आणि समाजाला सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करील. घाबरू नका. परंतु सुरक्षित राहा.

अ‍ॅड. प्रशांत माळी – सायबर तज्ञ

संगणकावर इंटरनेट हाताळताना…
• आपली वैयक्तिक व गोपनीय माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्ती अथवा वेबसाईटवर अपलोड करू नका
• आपला पासवर्ड वेळोवळी बदलत राहा.
• अनोळखी अथवा फसवे मेसेजेस्, ईमेल उघडू नका.
• ऑनलाईन बँकिंग व्यवहार करताना संकेतस्थळे सुरक्षित असल्याची खात्री करा.
• ऑनलाईन व्यवहार पूर्ण होताक्षणीच लॉगआऊट व्हा.
• ई-मेलद्वारा आलेल्या कोणत्याही लिंकस् ला कॉपी अथवा क्लिक करू नका.
•आपली वैयक्तिक माहिती मागणार्या कोणत्याही मेलला प्रतिसाद देऊ नका.
• कोणताही ऑनलाईन व्यवहार करताना सुरक्षितता, अटी, नियम, काळजीपूर्वक वाचा.
• अवैध व्यवहार झाला नसल्याची खात्री करण्यासाठी आपल्या खात्याचे स्टेटमेंट वेळोवेळी तपासा.

सुरक्षित ऑनलाईन शॉपिंग
• माहितीच्या, खात्रीच्या अशा विश्र्वासार्ह संकेतस्थळावरूनच खरेदी करा.
• शॉपिंग संकेतस्थळ सुरक्षित असल्याची खात्री करा.
• कोणत्याही व्यापारी संस्था विक्रेत्यांकडून भूलथापा, आमिष अथवा प्रलोभने दर्शविणार्या बेकायदेशीर दूरध्वनी संदेश अथवा ई-मेल पासून सावध राहा.
• खरेदीपूर्वी व्यापारी संस्थेची रिफंड आणि एक्सचेंजबाबत काय योजना आहेत याची खात्री करा.
•आपला पासवर्ड कोणालाही देऊ नका

संकलन – संतोष वाघ