Video: चोरी करताना भुंकत असलेल्या भटक्या कुत्र्याची हत्या करून पेटवले

व्यसनी तरुणांनी एका भटक्या कुत्र्याला मारून जाळून टाकले.

चोरीमध्ये नेहमी व्यत्यय आणणाऱ्या भटक्या कुत्र्यांपैकी एका कुत्र्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला करून त्याला जिवंत जाळून ठार मारण्यात आल्याची खळबळजनक घटना ठाण्यातील वाघबीळ या ठिकाणी घडली. या घटनेमुळे प्राणीमित्रामध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून मुक्या प्राण्यांवर या प्रकारे अत्याचार करणाऱ्याला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी प्राणीमित्र संघटनांकडून करण्यात येत आहे. ठाणे घोडबंदर रोडवरील वाघबीळ या ठिकाणी असणाऱ्या किंगकाँग नगर या ठिकाणी मागील काही महिन्यांपासून नशेखोरांचा सुळसुळाट झाला आहे. या नशेखोराकडून परिसरात रात्रीच्या वेळी लूटमार, चोऱ्या यासारखे प्रकार घडत आहे.

या नशेखोरांकडून भाडेतत्त्वावर राहणाऱ्या रहिवाश्यांना धमकी देऊन त्याच्याकडून पैसे लुटमार करीत असल्याचा तक्रारी स्थानिकांनी केलेल्या आहेत. शुक्रवारी मध्यरात्री या नशेखोर चोरांनी गुन्हेगारीचा कळसच गाठला. रात्रीच्या वेळी चोरी करण्यासाठी किंगकाँग परिसरात फिरणाऱ्या या चोरट्यांवर येथील भटके कुत्रे भुंकून चोरीमध्ये व्यत्यय आणत आल्यामुळे काही नशेखोर चोरांनी भुंकणाऱ्या एका भटक्या कुत्र्याला लोखंडी सळीने डोक्यात प्रहार करून जखमी केले त्यानंतर या कुत्र्याला जिवंत जाळून ठार मारले.

 

रात्रीच्या वेळी इतर कुत्र्याचा भूकण्याच्या आवाजामुळे जागी झालेल्या रहिवाश्यांच्या लक्षात हा प्रकार येताच या नशेखोरांनी धूम ठोकली. या घटनेची तक्रार कासारवडवली पोलिसांकडे देण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून विक्की उर्फ संतोष रेड्डी (२६) या नशेबाजाला अटक केली असून त्याच्या इतर सहकाऱ्याचा शोध सुरू आहे.