मृत अर्भकावरून प्रकरण उघडकीस; जन्मदात्याकडून अल्पवयीन राहिली होती गर्भवती

अत्याचार

अल्पवयीन मुलीवर वडिलांनी आणि मित्राने अत्याचार केल्याची संतापजनक घटना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी वासिंद पोलिसांनी वडील आणि मुलीच्या २२ वर्षाच्या मित्राला बदलापूर येथून अटक केली असून दोघांविरुद्ध अत्याचार आणि बाल अत्याचार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले वडील हे प्राथमिक शाळेत शिक्षक असून पीडितेच्या मित्र हा शिक्षण घेत आहे.

शहापूर तालुक्यातील वासिंद येथे एका इमारती जवळ ९ ऑक्टोबर रोजी सकाळी पोलिसांना स्त्री जातीचे नुकतेच जन्मलेले अर्भक जखमी अवस्थेत मिळून आले होते. पोलिसांनी ताबडतोब या अर्भकाला तालुका रुग्णालयात आणले असता त्याची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्याला जिल्हा रुग्णलयात घेऊन जाण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिल्यामुळे पोलिसांनी हे अर्भक जिल्हा रुग्णालय येथे घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती वासिंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गुरव यांनी दिली.

दरम्यान, हे अर्भक कुणाचे आहे याचा तपास सुरु असताना ज्या इमारतीजवळ हे अर्भक मिळून आले होते. त्याच इमारतीत राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणीचे हे अर्भक होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता तिच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. पीडित तरुणी ही १७ वर्षाची असताना तिचे वडील आणि तिच्या २२ वर्षाच्या मित्राने तिच्यावर शाररीक अत्याचार केला होता. या अत्याचारानंतर पीडित गर्भवती राहिली होती. घाबरून हा प्रकार तिने आईला देखील सांगितला नाही. शरीराने स्थूल असल्यामुळे ती गर्भवती असल्याचा संशय देखील कुणाला आला नाही, अशी माहिती पीडितेने पोलिसानां दिली. दरम्यान, वासिंद पोलिसांनी पीडितेच्या जबाबा वरून पीडितेच्या ५१ वर्षीय वडील आणि तिचा २२ वर्षाचा मित्र याच्याविरुद्ध बाल अत्याचार संरक्षक कायदा (पोक्सो) आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती सपोनि. योगेश गुरव यांनी दिली. पीडितेच्या वडील प्राथमिक शिक्षक असून वर्षभरापूर्वी हे कुटुंब नवीमुबईत राहण्यास होते, वर्षभरापूर्वी पीडित आणि तिचे कुटुंब वासिंद येथे राहण्यास आलेले असून पीडितेची आई घरोघरी स्वयंपाक बनवण्याचे काम करते अशी माहिती गुरव यांनी दिली. दरम्यान जन्मलेले अर्भकाचा त्याग करून त्याच्या मृत्यूस जवाबदार असल्याप्रकरणी पीडितेवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून तीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती सपोनि गुरव यांनी दिली.

हेही वाचा –

राज्यात ७०८९ नवे रुग्ण, १६५ जणांचा मृत्यू