वर्दीतील माणुसकी! कोरोनावर उपचार घेणाऱ्या दाम्पत्याच्या लहानग्याचा साजरा केला वाढदिवस

लॉकडाऊनच्या काळात दंडुके मारणारे पोलीस अनेकांना हैवान वाटले असतली. मात्र या वर्दीतील माणसाला कधी जाणूनच घेतले नाही. वर्दीच्या आत असलेल्या माणसात देखील मुलगा, पती, वडिल, भाऊ दडलेला आहे. लॉकडाऊनच्या काळात या वर्दीतील माणसाचे वेगवेगळे रूप अनेकांना बघायला मिळाले. भुकेलेल्यांना अन्न देताना, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णाला रुग्णालयात पोहोचवताना तर कधी मुलगा बनून, तर कधी भाऊ बनून महिलांच्या मदतीसाठी धावणारा हा वर्दीतला माणूस आपण पाहिला आहे. तर आज चक्क एका सात वर्षाच्या मुलाचे पालक बनून या मुलाचा वाढदिवस साजरा करून त्याच्या चेहऱ्यावरील हसू आणण्याचे कार्य या पोलिसांनी केले आहे.

मुंब्रा शीळ डायघर परिसरात राहणारे एक दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यांच्यावर वाशीच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पतीपत्नी दोघेही कोविडच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल असतांना घरी त्यांचा सात वर्षाचा मुलगा आणि वृद्ध आई हे दोघेच आहेत. मंगळवारी या दाम्पत्याच्या सात वर्षाच्या मुलाचा वाढदिवस होता. मुलाचा वाढदिवस साजरा करू शकत नसल्याचे दुःख या दाम्पत्याला झाले होते. मुलाने फोन करून आई बाबा आज माझा वाढदिवस आहे, तुम्ही येताय ना असे विचारले होते. त्यामुळे दोघांच्या मनाची घालमेल सुरू असताना मुलाच्या वडिलांनी ठाणे पोलिसांच्या ट्विटरवर ‘मुलाचा वाढदिवस असून, तुम्ही मुलाला शुभेच्छा देऊ शकता का’ असे ट्विट केले. मग काय या वर्दीत दडलेला माणूस पालकाच्या रूपाने पुढे आला.

मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, शीळ डायघर पोलीस ठाण्याचे चंद्रकांत जाधव हे आपल्या काही महिला व पुरुष अधिकारी आणि कर्मचारी यांना घेऊन पालकांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी हातात केक, खेळणी घेऊन पोहोचले या दाम्पत्याच्या घरी. घरी पोलीस आल्याचे बघून दाम्पत्याच्या वृद्ध आईला मनात थोडं धस्स झालं. मात्र आम्ही सध्या पोलीस नसून तुमच्या नातवाचा वाढदिवस साजरा करायला आलो असल्याचे सांगताच या वृद्ध महिला आणि तिच्या नातवाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आले. वाढदिवस साजरा होणार म्हणून मुलाला आनंद झाला. मग काय काका, मामा, दीदी बनून आलेल्या वर्दीतल्या माणसासोबत मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा झाला. हा आनंदाचा क्षण मोबाईलच्या कॅमेरात टिपून कोविड १९ वर वाशी येथील रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दाम्पत्याना पाठवण्यात आला. हा आगळावेगळा साजरा झालेल्या वाढदिवसाची चर्चा ठाण्यात दिवसभर रंगली होती.

हेही वाचा –

कोरोना पॉझिटिव्ह महिलेला कोरोना नसल्याचं सांगत पाठवलं घरी; दुसऱ्या दिवशी झाला मृत्यू