ठाण्यात सव्वा तीन कोटींचा चरस जप्त

शहरातील मुंब्रा परिसरात विक्रीसाठी मागवण्यात आलेला तीन कोटी २५ लाख किमतीचा ’चरस’ कळव्यातील खारेगाव टोल नाका येथे पकडण्यात आला आहे. हि कारवाई ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी रात्री केली असून याप्रकरणी ट्रक चालक आणि क्लिनरला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन दिवसापूर्वीच मुंब्रा परिसरात गुन्हे शाखेने मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला होता.

मुंबई नाशिक महामार्ग येथून एका ट्रक मधून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचा साठा मुंब्रा येथे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय पोवार यांनी आपल्या पथकासह मंगळवारी रात्री कळव्यातील खारेगाव टोल नाका येथे सापळा रचला असता एक ट्रक मुंब्रा दिशेने जात असताना सध्या वेशातील पोलिसांनी ट्रक अडवून चालक आणि क्लिनरला ताब्यात घेऊन ट्रक मध्ये असलेला माल तपासला असता त्यात ८० किलो चरस मिळून आला. अंमली पदार्थ विरोधी पथकाने चरस हा अंमली पदार्थ आणि ट्रक ताब्यात घेऊन कळवा पोलीस ठाण्यात आणून ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रक चालक आणि क्लिनर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली.

दोघांकडे कसून चौकशी केली असता जप्त करण्यात आलेला चरस हा मुंब्रा येथे विक्रीसाठी आणण्यात आला होता अशी माहिती या दोघांनी पोलिसांना दिली. जप्त करण्यात आलेल्या चरसची किंमत तीन कोटी २५ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा चरस कोणी पाठवला व मुंब्र्यात कुणाला देण्यात येणार होता याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान काही दिवसापूर्वीच अमली पदार्थ विरोधी पथकाने ठाण्यातून साडेसहा किलो गांजासह दोन तरुणांना अटक केली होती, तसेच दोन दिवसापूर्वी ठाणे गुन्हे शाखा घटक १ यांनी मुंब्रा येथून पाच किलो गांजासह दोघांना अटक केली होती. मुंबईसह ठाण्यात अमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून हा जप्त करण्यात आलेला अमली पदार्थ मुंबई, नवीमुंबई रायगड येथे टप्प्याटप्प्याने पाठवण्यात येणार होता अशी शक्यता पोलीसानी वर्तवली आहे.