इमारतीच्या बंद खोलीत सापडले प्रेमी युगुलाचे मृतदेह; अंबरनाथमध्ये खळबळ

murder

मागील तीन दिवसांपासून घरातून बेपत्ता असलेल्या एका विवाहितेचा आणि तिच्या प्रियकराचा मृतदेह अंबरनाथ येथील एका इमारतीच्या बंद खोलीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून प्रियकराच्या गळ्यावर ग्राईन्डरने कापल्याच्या जखमा दिसल्या आहेत. प्रेयसीचा मृत्यू कसा झाला याबाबत पोलिसांना देखील अद्याप कळू शकले नसल्याची माहिती शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली. प्राथमिक तपासावरून प्रेयसीची हत्या करून प्रियकराने स्वतः आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असला तरी अद्याप गुन्हा दाखल न करता अपमृत्यूची नोंद घेण्यात आली असल्याचे भोगे यांनी सांगितले. या घटनेमुळे अंबरनाथमध्ये खळबळ उडाली आहे.

अंबरनाथ येथील शिवाजी नगर परिसरात राहणारी शिल्पा (काल्पनिक नाव) ही विवाहिता १७ नोव्हेंबर पासून घरातून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पतीने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात केली होती. शिल्पा बेपत्ता झाल्यापासून तिच्या पतीसोबत एकाच कंपनीत नोकरी करणारा संदीप सक्सेना (३३) हा देखील त्या दिवसापासून बेपत्ता झाला होता. पोलिसांच्या अधिक चौकशीत शिल्पा आणि संदीपचे मागील २ ते ३ वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरु होते. संदीप देखील विवाहित असून त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नाही. या दोघांच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण शिल्पाच्या पतीला लागली होती, अशी माहिती शिवाजी नगर पोलिसांना मिळाली होती. या दोघांचा शोध सुरु असताना संदीप हा अंबरनाथ पूर्वेला असणाऱ्या प्रसादम रेसिडेन्सी येथे मित्राच्या रिकाम्या खोलीवर नेहमी रहायला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी संदीपचा मित्र रमेश अपुरे याच्या खोलीवर जाऊन बघितले असता त्या ठिकाणी शिल्पा आणि संदीप या दोघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडले. तसेच संदीप याच्या मृतदेहाशेजारी लोखंड कापण्याची ग्राईन्डर मशीन सापडली. संदीपच्या गळ्यावर ग्राईन्डर मशिनने कापल्याच्या जखमा देखील सापडल्या. मात्र शिल्पाच्या शरीरावर कुठल्याही प्रकारची जखम दिसली नसल्याचे वपोनि भोगे यांनी दिलेल्या माहितीत सांगितले. पोलीसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सिव्हिल रुग्णलायात पाठवण्यात आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासावरून शिल्पाची हत्या करून संदीपने आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या दोघांची हत्या करण्यात आली असावी अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत असून या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी अपमृत्यु नोंद केली असून तपास सुरु असल्याची माहिती वपोनि भोगे यांनी दिली. याप्रकरणी शिल्पाच्या पतीकडे देखील चौकशी करण्यात येणार असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.