घरठाणेदोन करोड खर्च करून उल्हासनगर शहराच्या बाहेर ४०० बेडचे कोविड रुग्णालय!

दोन करोड खर्च करून उल्हासनगर शहराच्या बाहेर ४०० बेडचे कोविड रुग्णालय!

Subscribe

महापालिका क्षेत्रातील गंभीर कोरोना रुग्णांची संख्या ५९ असून पालिकेच्या रुग्णालयातील तब्बल ९६ बेड रिकामे असताना ही उधळपट्टी कशासाठी असा प्रश्न निर्माण होत आहे.

उल्हानसागर शहराच्या हद्दीपासून पाच किलोमीटर लांब मुरबाड रस्त्यावर असलेल्या ताबोर आश्रमात महापालिका सुमारे दोन करोड रुपये खर्च करून कोविडच्या उत्तरार्धात ४०० बेडचे रुग्णालय उभारत आहेत. महापालिका क्षेत्रातील गंभीर कोरोना रुग्णांची संख्या ५९ असून पालिकेच्या रुग्णालयातील तब्बल ९६ बेड रिकामे असताना ही उधळपट्टी कशासाठी असा प्रश्न निर्माण होत आहे.

उल्हासनगर महापालिका शहरातील मध्य असलेल्या शिवाजी चौक येथून कांबा येथील ताबोर आश्रम हा पाच किलोमीटर लांब आहे. ह्या आश्रमात मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन धर्मगुरू, धर्म प्रसारक, अभ्यासगत याना राहण्यासाठी खोल्या आहेत. या इमारतीला पालिका आयुक्त डॉ. राजा दयानिशी यांनी महिन्याभरापूर्वी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या बरोबर भेट दिली. त्यावेळी शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येने सहा हजाराचा टप्पा ओलांडला होता. तसेच तीन हजाराच्या घरात रुग्ण हे विविध रुग्णालयात उपचार घेत होते. त्यामुळे रुग्ण संख्या वाढली तर या ठिकाणी ४०० बेडचे रुग्णालय बांधण्याचे ठरले होते.

- Advertisement -

त्यानुसार या ठिकाणी इलेक्ट्रिकचे काम करण्यासाठी अंदाजे ५० लाख रुपयांचा ठेका काढण्यात आला होता. प्राप्त माहितीनुसार हा ठेका देताना निविदेत सर्वात कमी दरात काम करण्यासाठी तयार असलेल्या अंबरनाथच्या ठेकेदाराला संशयास्पद रीतीने निविदेतून वगळण्यात आले . याच ताबोर आश्रमात ४०० बेडच्या ऑक्सिजन टॅंक आणि पाईपलाईनच्या कामासाठी ९३ लाख रुपयांची तर पार्टीशन आणि बांबू बॅरेकेटींगचा ६१ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.

उल्हासनगर महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांवर उपचार करणारी दोन रुग्णालये आहेत. महापालिकेच्या कॅम्प ४ येथील रुग्णालयात ७५ बेड असून त्यापैकी ४० बेड खाली आहेत. तसेच सत्यसाई प्लॅटिनम कोविड रुग्णालयात ८० बेड असून त्यापैकी ५६ बेड खाली आहेत. जर शहरातील बेड खाली असतील तर शहराबाहेर करोडो रुपयांचा खर्च करणे, चुकीचे असल्याचे मत तज्ञमंडळी व्यक्त करीत आहेत.

- Advertisement -

ताबोर आश्रमाला जाणारा मार्ग खडतर

उल्हासनगरच्या कॅम्प १ मधून म्हारळ गाव मार्गे कांब येथे जात येते. येथे जाण्यासाठी कल्याण मुरबाड महामार्ग आहे, या महामार्गाचे चौपदरी कारणाचे काम चालू आहे. हे काम उल्हासनगर हद्दी पर्यंत झाले असून पुढे रास्ता खड्डेमय आहे. अश्या परिस्थितीत उल्हासनगरच्या शिवाजी चौक येथून ताबोर आश्रम येथे जाण्यास साधारण ४५ मिनिटे लागतात, मात्र ह्या रस्त्याला वाहतूक कोंडी नित्यनेमाची असल्याने १ तासापेक्षा अधिक वेळ हि लागतो. जे कोरोनाच्या थर्ड स्टेजवर असलेल्या रुग्णांना सकारात्मक नाही आहे. तसेच पालिकेकडे कार्डियाक रुग्णवाहिका नसल्याने गंभीर रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्यास ताबोर आश्रमाचा रुग्णालय प्रयोग हा रुग्णांच्या जिवावर बेतणारा आहे.

उल्हासनगर मध्येही होऊ शकते रुग्णालय

उल्हासनगर महापालक क्षेत्रात आयटीआयची नवीन इमारत आहे. येथे सद्यस्थितीत महापालिकेने कोविड सेंटर सुरु केले आहे. ह्या कोविड सेंटरमध्ये ९० बेड आहेत. त्यातील बहुतांश खाली आहेत आणि जे रुग्ण आहेत त्यांना वेदांता किंवा अभ्यासिकेत स्थलांतरित केले जाऊ शकते. या ठिकाणी रुग्णालय विकसित केल्यास ते कायमस्वरूपी हि करता येऊ शकते. कोरोना नंतर महापालिकेचे हक्काचे रुग्णालय असेल. या उलट ताबोर आश्रमात उभारलेले इन्फ्रास्ट्रक्चर हे तोडून भंगारवाल्याला देण्यात येईल. आयटीआयच्या मालकीची उल्हासनगर कॅम्प ४ मध्ये संतोष नगर मध्ये जवळपास २० एकर जागा दुर्लक्षित आहे, त्या ठिकाणी नवीन आयटीआयची इमारत उभारता येईल.

पालिकेकडून कोरोनाच्या दुसऱ्या लहरची तयारी

उल्हासनगर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. मात्र मात्र कोरोना विषाणूची दुसरी लहर येण्याची दाट शक्यता असल्याने ताबोर आश्रमाच्या जागेवर ४०० बेड्चे रुग्णालय शासनाच्या आदेशाने उभारण्याचे काम चालू असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.


Weather Alert: येत्या २४ तासात अती मुसळधार पावसाची शक्यता!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -