Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे ठाण्यात १४ बगळे मृतावस्थेत बर्ड फ्लूच्या शक्यतेने दहशत

ठाण्यात १४ बगळे मृतावस्थेत बर्ड फ्लूच्या शक्यतेने दहशत

Related Story

- Advertisement -

कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच ठाण्यात तब्बल 14 बगळे मृतावस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या पक्ष्यांचा बर्ड फ्लूने तर मृत्यू झाला नाही ना, अशी शंका स्थानिकांना सतावत आहे. एकाच वेळी इतके बगळे मृतावस्थेत आढळल्याने ठाणे, मुंबईकरांचीही धाकधूक वाढली आहे. कोरोनाच्या संकटातून सावरत असताना बर्ड फ्लूच्या नव्या संकटाने भारतात शिरकाव केल्याने केंद्र सरकार आणि नागरिकांची चिंता वाढली आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील विजय गार्डन या गृहसंकुलात बुधवारी (6 जानेवारी) मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या काही नागरिकांना एकामागोमाग एक असे काही बगळे मृतावस्थेत आढळून आले. अनेक बगळे एकाच वेळी मृत सापडल्याने काहीतरी गंभीर कारण असल्याचे त्यांना जाणवले. नागरिकांनी एकत्र येत हे पक्षी गोळा केले तर तब्बल 14 पाँड हेरॉन जातीचे बगळे मृत झालेले आढळून आले.

- Advertisement -

साधारणतः पाणवठ्याच्या आसपास हे बगळे आढळून येतात. ते उंच झाडांवर आपली घरटी बनवतात. एकाच वेळी एवढे पक्षी मेल्याने घटनास्थळी पोहोचलेले ठाणे महापालिकेचे पशू वैद्यकीय अधिकारी देखील बुचकळ्यात पडले. सध्या देशाच्या अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूचे प्रमाण वाढत असून सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. देशातील अनेक शहरात अनेक पक्षी अचानक मृत्यूमुखी पडले असून यामागे बर्ड फ्लूचे विषाणू असल्याचे आढळून आले आहे.

महाराष्ट्रात बर्ड फ्लूने शिरकाव केल्याचे अधिकृत माहिती नसल्याने हे बगळे कशामुळे मेले, यावर उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. वन विभागाच्या अधिकार्‍यांनी मृत पक्षी ताब्यात घेतले असून मृत्यूचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती ठाणे पालिका उपायुक्त संदिप माळवी यांनी दिली आहे.

- Advertisement -