घरठाणेनवे वर्ष ग्रहणमुक्त

नवे वर्ष ग्रहणमुक्त

Subscribe

उद्यापासून २०२१ या नूतन वर्षाचा प्रारंभ होणार आहे. या नवीन वर्षांमध्ये आकाशात एकूण ४ चंद्र-सूर्य ग्रहणे होणार आहेत. परंतु आपल्याला इथून एकही ग्रहण दिसणार नाही. त्यामुळे २०२१ हे नूतन वर्ष ‘ ग्रहणमुक्त’ आहे असे म्हणता येईल असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले. त्याबरोबर यावर्षी दोन वेळा सुपरमून दिसणार आहे.

सन २०२१ या नवीन वर्षात काय घडणार आहे. या विषयी माहिती देताना दा. कृ. सोमण यांनी, बुधवारी २६ मे रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण आपल्या इथून दिसणार नसून ते फक्त ईशान्य भारतातील जगन्नाथपुरी, भुवनेश्वर, कटक कोलकाता ,आसाम, मिझोराम, मेघालय, नागालँड, अरुणाचल प्रदेश येथून दिसणार आहे.

- Advertisement -

तसेच या नूतन वर्षी गुरुवार १० जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण, शुक्रवार १९ नोव्हेंबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आणि शनिवार ४ डिसेंबर रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. परंतु ही तीनही ग्रहणे भारतातून दिसणार नाहीत. तर पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर त्याला ‘ सूपरमून’ म्हणतात. अशावेळी चंद्र १४ टक्के मोठा व ३० टक्के जास्त तेजस्वी दिसणार आहे. मंगळवार २७ एप्रिल आणि बुधवार २६ मे रोजी असे आकाशात दोनवेळा सुपरमून दिसणार आहे.

चंद्रबिंब जेव्हा एखाद्या ग्रह किंवा तारकेला झाकून टाकते त्याला ‘ पिधान युती’ म्हणतात. यावर्षी शनिवार १७ एप्रिल रोजी चंद्र- मंगळ पिधान युती दिसणार आहे. मंगळ चंद्राआड जाताना दिसणार नाही. परंतु सायंकाळी ७-२१ वाजता मंगळ ग्रह चंद्रबिंबामागून बाहेर पडताना दिसणार आहे. खगोलप्रेमींसाठी ही दुर्मीळ घटना पर्वणी ठरणार आहे.

- Advertisement -

नव्या वर्षात उल्कावर्षाव पहायला मिळणार
या नूतन वर्षी दरवर्षींप्रमाणे ४ जानेवारी, २२ एप्रिल, ५ मे, २० जून, २८ जुलै, १२ ऑगस्ट, २२ ऑक्टोबर,१७ नोव्हेंबर आणि १३ डिसेंबर रोजी रात्री आकाशातून उल्कावर्षाव होताना पहायला मिळणार आहे. सन २०२१ मध्ये १९ जानेवारी ते ११ फेब्रुवारी गुरू ग्रह आणि २१ फेब्रुवारी ते १६ एप्रिल शुक्र ग्रह सूर्यतेजात लुप्त झाल्यामुळे दिसणार नाहीत.

नवीन वर्षात सुट्ट्यांची चंगळ
२५ सुट्ट्यांपैकी २५ एप्रिल महावीर जयंती आणि १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन या दोनच सुट्ट्या रविवारी आल्या आहेत. चाकरमान्यांना २३ सुट्ट्या मिळणार असल्याने सुट्ट्यांची चंगळ होणार आहे. एप्रिल महिन्यात आलेल्या ५ सुट्ट्यांपैकी १३ एप्रिल गुढीपाडवा आणि १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या दोन सुट्ट्या जोडून आल्या आहेत.

नव्या वर्षात शुभ विवाहाचे अनेक मुहूर्त
विवाहेच्छुकांसाठी आनंदाची बातमी मार्च, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे चार महिने वगळता इतर आठ महिन्यात भरपूर विवाह मुहूर्त आहेत. गणेशभक्तांसाठी २ मार्च, २७ जुलै आणि २३ नोव्हेंबर अशा तीन अंगारकी संकष्ट चतुर्थी आलेल्या आहेत. सुवर्ण खरेदी करणार्‍यांसाठी २८ जानेवारी, २५ फेब्रुवारी,३० सप्टेंबर,२८ ऑक्टोबर आणि २५ नोव्हेंबर असे ५ गुरुपुष्य योग आले आहेत.

नूतन वर्ष लीपवर्ष विनाच
२०२१ हे नूतन वर्ष लीपवर्ष नसल्याने या वर्षात कामे करायला फक्त ३६५ दिवसच मिळणार आहेत. तसेच सरत्या २०२० वर्षात ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता लीप सेकंद मोजला जाणार नसल्याने नूतन वर्षारंभ रात्री ठीक १२ वाजताच होणार आहे. मात्र, पृथ्वीच्या गतीत होणार्‍या बदलामुळे सन २०२१ मध्ये ३० जूनला रात्री १२ वाजता लीप सेकंद मोजला जाण्याची शक्यता असल्याचेही पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक सोमण यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -