घरक्राइमदिवाळी साजरी करण्यासाठी एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न, दोघांना अटक

दिवाळी साजरी करण्यासाठी एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न, दोघांना अटक

Subscribe

लॉकडाऊनमुळे आलेल्या बेरोजगारीमुळे दिवाळीचा सण साजरा कसा करायचा? या विवंचनेत असणाऱ्या दोन तरुणांनी बँकेच्या एटीएम मशीन सेंटरमध्ये चोरीचा प्रयत्न केला. मात्र, मशीनमधून त्यांना रोकड चोरता न आल्यामुळे त्यांनी एटीएम मशीनची तोडफोड करून पोबारा केला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून या दोघांचा शोध घेऊन अटक करण्यात आली असल्याची माहिती वर्तक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली आहे. सूरज बाथडे (२१) आणि प्रकाश गांगुर्डे (२४) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

लोकमान्य नगर पाडा क्रमांक ४ ठाणे या ठिकाणी राहणाऱ्या दोघांच्या घरची परिस्थिती हलाखीची असून त्यात लॉकडाऊनच्या काळात आहे ती नोकरी गेल्यामुळे दोघेही बेरोजगार झाले होते. त्यातच दिवाळी सण आल्यामुळे पैशाशिवाय सण साजरा कसा करायचा? या विचारात असताना दोघांनी बँकेच्या एटीएम मशीनमधून रोकड चोरी करायचे ठरवले. मंगळवारी मध्यरात्री या दोघांनी पाचपाखाडी सावरकर नगर या ठिकाणी असलेल्या एका राष्ट्रीयिकृत बँकेचे एटीएम सेंटरचे शटर तोडून मशिनमधून रोकड काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बराच प्रयत्न करूनही मशिनमधून रोकड काढता येत नसल्यामुळे दोघांनी रागाने एटीएम सेंटर आणि मशीनचे नुकसान करून तेथून पोबारा केला.

- Advertisement -

दुसऱ्या दिवशी एटीएम मशीनमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना समजली असता बँकेने वर्तक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वर्तक नगर पोलिसांनी घटनास्थळी घेऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने वर्तक नगर पोलिसांनी या दोघांचा शोध घेऊन लोकमान्य नगर येथून दोघांना अटक केली असल्याची माहिती वर्तक नगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना दिली. दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी दोघांना पैशांची गरज होती. यामुळे दोघांनी चोरीचा प्रयत्न केला असल्याची कबुली दोघांनी दिली असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -