घरक्राइमआर्थिक वादातून हत्येसाठी २ लाखाची सुपारी देणाऱ्या महिलेसह चौघांना अटक

आर्थिक वादातून हत्येसाठी २ लाखाची सुपारी देणाऱ्या महिलेसह चौघांना अटक

Subscribe

एका ४७ वर्षीय इसमाच्या हत्येप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी दोन महिलांसह चौघांना अटक केली आहे. आर्थिक वादातून या इसमाच्या हत्येसाठी २ लाख रुपयाची सुपारी अटक करण्यात आलेल्या एका महिलेने दिली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ही खळबळजनक घटना ठाण्यातील घोडबंदर रोड, नागला बंदर येथे मंगळवारी उघडकीस आली असून मृतदेहाचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली.

तानाजी जावीर (४७) असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. तानाजी जावीर हे मागील दहा ते बारा वर्षांपासून ठाण्यातील घोडबंदर रोडवरील नागला बंदर येथे राहणाऱ्या कल्पना नागलकर (४५) हिच्याकडे काम करून तिच्याकडेच राहण्यास होता. १७ नोव्हेंबर रोजी तानाजी हा बेपत्ता असल्याची तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मात्र पोलिसांना याबाबत संशय आल्यामुळे पोलिसांनी तानाजी जावीर याच्याबाबत परिसरात माहिती काढण्यास सुरुवात केली असता पोलिसांना तानाजीच्या बेपत्ता होण्यामागे तक्रारदार कल्पना नागलकर हिच्यावर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी कल्पना नागलकर हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे उलट तपासणी केली असता तिच्या चौकशीत धक्कादायक बाब समोर आली आहे.

- Advertisement -

तानाजी हा कल्पना हिच्यासोबतच तिच्या घरी मागील दहा ते बारा वर्षांपासून राहण्यास होता. मात्र, मागील काही महिन्यांपासून तानाजी हा कल्पनाला त्रास देऊन लागला होता. तसेच त्याने कल्पनासोबत काही आर्थिक व्यवहार देखील केला होता. या व्यवहारातून दोघांत सतत भांडणे होऊ लागल्यामुळे कल्पनाने त्याचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले. यासाठी तिने घोडबंदर येथे राहणाऱ्या गीता अविनाश आरोळकर (४५) या महिलेची मदत घेतली. कल्पनाने तानाजीची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गीता या महिलेला २ लाखांची सुपारी दिली होती. गीताने यासाठी आपला भाचा संतोष घुगरे याला त्यातील काही पैसे देऊन तानाजीच्या हत्येसाठी तयार केले.

दरम्यान, संतोष याने मंगेश मुरुडकर (३०) याची मदत घेऊन १७ नोव्हेंबर रोजी तानाजीची हत्या करून मृदेह नागला बंदर येथील खाडीत फेकून दिला असल्याची कबुली कल्पना हिने पोलिसांना दिली, असे कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली. कासारवडवली पोलीस ठाण्यात कल्पना हिच्यासह चौघांविरुद्ध हत्या, मृतदेहाची विल्हेवाट लावणे, हत्येचा कट रचणे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी बुधवारी चौघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती खैरनार यांनी दिली आहे. तानाजी जावीर याचा मृतदेह अद्याप सापडलेला नसून मृतदेह शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -