बोगस डॉक्टर करत होता कोरोना रुग्णांवर उपचार; मनसेने केला पर्दाफाश

कल्याणमधील खडक पाडा येथील साई लीला आणि कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथील माउली हॉस्पिटल चालवणारा तसेच स्वतःला डॉक्टर म्हणवणारा अमित साहू या बोगस व फसव्या डॉक्टरचा पर्दाफाश आज, मंगळवारी मनसेने रुग्णाच्या नातेवाईकाच्या मदतीने केला. कल्याण खडक पाडा येथील साई लीला या डॉ. कुलकर्णी यांच्या हॉस्पिटलला तात्पुरत्या स्वरूपात भाडेपट्टीवर चालवण्यास अमित साहू नावाच्या बोगस डॉक्टरने घेतले होते. लाखो रुपये भाडे मिळणार म्हणून ते भाडेपट्टीवर कुठलीही शहनिशा न करता चालविण्यास दिले.

या हॉस्पिटलमध्ये कोविड तसेच नॉन कोविड रुग्णांवर उपचार हा बोगस डॉक्टर करत होता. जागेचे मालक डॉ. कुलकर्णी यांना भाडेपट्टीचा दिलेला धनादेश बाउंस झाल्यावर संशय आला. त्यानंतर त्यांनी जागा खाली करायला लावली. या बोगस डॉक्टरने जे रुग्ण दाखल होते त्यांना परस्पर रुग्णाच्या नातेवाईकांना न कळवता तसेच खोटे कारण देत कल्याण पूर्व चिंचपाडा येथील माउली हॉस्पिटलला शिफ्ट केले. या हॉस्पिटलमध्येही हा बोगस डॉक्टर प्रॅक्टिस करत होता. हे हॉस्पिटल अजूनही तो भाडे तत्त्वावर चालवतो. माउली ऑस्पिटल हे खासगी व नॉन कोविड आहे. तिथेसुद्धा त्याने कोविड रुग्ण दाखल करून उपचार केल्याचे समजते.

तीन दिवस संबंधीत रुग्णावर उपचार केल्यानंतर व नातेवाईकांपासून रुग्णाला लांब ठेवल्यावर परत त्याने रुग्ण गंभीर आहे. त्याला तिसऱ्या आई आरोग्यम या हॉस्पिटलमध्ये हलवा, असे सांगून रुग्णवाहिका बोलावून तसे त्याने शिफ्टिंग सुरु केले. पण नातेवाईकांनी रुग्णाची गंभीर अवस्था बघून त्याला आपल्या ताब्यात घेऊन डोंबिवलीच्या खासगी हॉस्पिटलला दाखल केले. सध्या रुग्ण गंभीर स्थितीत आहे. हा बोगस डॉक्टर नातेवाईकांना खोटे सांगायचं की, तो स्वतः डॉक्टर आहे. तसेच नातेवाईकांकडून सतत पैसे उकळायचा. अखेर आज मनसेने याचा भांडाफोड करत आमदार राजू पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम, पदाधिकारी हरीश पाटील, योगेश गव्हाणे, सागर जेधे, अनंत गायकवाड, सचिन कस्तूर, स्वप्निल वाणी यांनी माउली हॉस्पिटलला धडक दिली. परंतु बोगस डॉक्टर तिथून पळून गेला. पोलिसांचा प्रचंड फौजफाटा आधीच बंदोबस्ताला लागल्याने त्याला कुणकुण लागली असेल, पोलिसांनी त्याला फोन करून उद्या पोलीस स्टेशनमध्ये बोलावले आहे. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांनी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांची भेट घेऊन अमित साहुला बोगस डॉक्टर जाहीर करून त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. याबाबत अर्जही दाखल केला.

हेही वाचा –

दिलासादायक! कोरोनावर मात करून बरे झालेल्या रूग्णांमध्ये भारत प्रथम स्थानी