अजब, पतियाळा कोर्टात १२ पोपटांची परेड; कारण वाचून व्हाल हैराण

New Delhi
12 parrots produced in patiala court
१२ पोपटांना कोर्टात सादर केले

दिल्लीतर पतियाळा हाऊस कोर्टात एक अजब प्रकार पाहायला मिळाला. एरवी कोर्ट म्हटलं की आरोपी, फिर्यादी, वकील, पोलीस, पत्रकार आणि याचिकाकर्त्यांची गर्दी आपण पाहतो. मात्र पतियाळा कोर्टात एका खटल्याच्या निमित्ताने चक्क पोपटांना न्यायाधीशांच्या समोर आणले गेले. १२ पोपट एका प्रकरणाच्या चौकशीसाठी पतियाळा कोर्टात आणले गेले. मात्र हे पोपट काही आरोपी वैगरे नव्हते, ते होते विक्टीम…

झालं असं की, केंद्रीय आद्योगिक सुरक्षा विभागाने (Central Industrial Security Force – CISF) एका परदेशी नागरिकाला १२ पोपटांसहीत दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली होती. कारण हे १२ पोपट उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथून तस्करी करुन आणले होते.

तस्करी करणारा आरोपी हा मुळचा ताश्कंद येथील राहणारा आहे. त्याने तागाच्या बॉक्समधून हे १२ पोपट चोरून आणले होते. वन्यजीव अधिनियमानुसार पोपटाची विक्री आणि खरेदीवर भारतात बंदी आहे. सीमाशुल्क विभागाच्या तपासणीत हे पोपट आढळून आल्यानंतर संबंधित व्यक्तिला अटक करण्यात आली. पतियाळा कोर्टात आरोपीला सादर केल्यानंतर कोर्टाने त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. आरोपी गजाआड गेल्यानंतर कोर्टाने पोपटांना मोकळे सोडण्याचा आदेश दिला आहे, त्याप्रमाणे ओखला पक्षी अभयारण्यात सोडण्यात आले.