‘मला सिंधूशी लग्न करू द्या, नाहीतर तिला किडनॅप करेन’; ७० वर्षीय वृद्धाची मागणी!

भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला एक लग्न प्रस्ताव आलेला आहे. पण तो आलाय चक्क एका ७० वर्षांच्या म्हातारबुवांकडून!

Mumbai
malaisamy want to marry p v sindhu
सिंधूशी लग्नासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेले मलायसामी! (Courtesy-India Today)

बातमीचं शिर्षक वाचून कदाचित तुम्हाला असं वाटेल की हा कोणता विनोद आहे. पण ही वास्तवातली घटना आहे. एका ७० वर्षाच्या वृद्धाने आपल्याला २४ वर्षांच्या पी. व्ही. सिंधूशी लग्न करायचं आहे, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे, जर आपल्याला तिच्याशी लग्न करू दिलं नाही, तर मी तिचं अपहरण करेन, अशी धमकीच या वृद्ध गृहस्थाने दिली आहे. हा प्रकार आहे तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातला आणि या हौशी नवरोबांचं नाव आहे मलायसामी! शिवाय, आमच्या लग्नासाठी सरकारनंच तयारी करून द्यावी, असं देखील या महाशयांचं म्हणणं आहे. या प्रकारामुळे रामनाथपुरमचे जिल्हाधिकारी देखील काही काळ नि:शब्द झाले!

तक्रार सभेमध्ये अवतरले नवरोबा!

प्रत्येक आठवड्याला जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची तक्रार सभा भरते. यामध्ये सामान्य नागरिक आपल्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडतात. त्यावर जिल्हाधिकारी शक्य असल्यास लगेच किंवा लेखी आश्वासनासह अधिकाऱ्यांना निर्देश देऊन तातडीने ते प्रकरण मार्गी लावतात. तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यात भरलेल्या अशाच एका तक्रार सभेमध्ये ७० वर्षांचे मलायसामी आले होते. इतरांप्रमाणेच मलायसामी यांची देखील अशीच एखादी मालमत्तेसंदर्भातली किंवा कागदपत्रांची तक्रार असेल, असं समजून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना विचारणा केली. पण समोर आला तो प्रकार भलताच होता!

बाबांच्या अर्जावर सिंधूचा फोटो

मलायसामींनी त्यांच्यासोबत आणलेल्या अर्जावर पी. व्ही. सिंधूचा फोटो लावला होता. या अर्जामध्ये मलायसामी यांनी पी. व्ही. सिंधूशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. नुसती इच्छाच नाही तर त्यासोबत त्यांनी प्रशासनालाच इशारा देखील दिला होता. ‘मला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिच्याशी लग्न करायचं आहे. त्यासाठीची तयारी प्रशासनाने करावी. पण जर हे झालं नाही, तर मी सिंधूचं अपहरण करेन’, असा इशाराच मलायसामींनी दिला आहे. या प्रकारामुळे गडबडलेल्या अधिकाऱ्यांनी म्हातारबुवांना कसंतरी समजावून त्यांची पाठवणी केली. पण त्यांचा उत्साह पाहाता ते सिंधूच्या घरी तिचा हात मागण्यासाठी धडकले नाहीत म्हणजे झालं, अशीच स्थिती तिथल्या अधिकाऱ्यांची काही काळ झाली!

‘मी तर १६च वर्षांचा’!

दरम्यान, या ७० वर्षांच्या म्हातारबुवांनी असाच आणखी एक अजब दावा केला आहे. ‘माझा जन्म ४ एप्रिल २००४ रोजी झाला असून मी अजून १६ वर्षांचाच आहे. सिंधूची प्रगती पाहून मी प्रभावित झालो आहे. म्हणून मला तिच्याशी लग्न करायचं आहे’, असं ते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here