अखेर अंतराळवीरानं पाऊल ठेवलं; पण चंद्रावर नव्हे…!

एका अॅस्ट्रॉनॉटनं कुठल्यातरी ग्रहावर पाऊल ठेवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर लोकांना खरी गोम लक्षात आली आणि सोशल मीडियावर हास्यकल्लोळ उठला!

Bangalore
astronaut in bangalore
...आणि अॅस्ट्रोनॉटनं जमिनीवर पाऊल ठेवलं!

सध्या भारताच्या चांद्रयान मोहिमेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर एका अंतराळवीरानं भूपृष्ठावर पाऊल ठेवलं आहे. त्याचा व्हिडिओच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओचं विशेष म्हणजे हा व्हिडिओ नासाने जारी केलेला नाही. आणि त्याहून विशेष बाब म्हणजे हा अंतराळवीर चंद्रावर उतरलेला नाही. मात्र, त्याच्या पायाखालची जमीन कुठल्यातरी ग्रहावरचीच भासावी अशी आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहाणाऱ्यांना सुरुवातीला जरी तो चंद्र वाटत असला, तरी तो मात्र चंद्र नाही. हा व्हिडिओ पुढे पाहिल्यानंतर तुम्हाला या ग्रहाची ओळख पटते!

बंगळुरू नावाचा ग्रह!

हा ग्रह आहे बंगळुरू! पण बंगळुरू हा कुठला ग्रह नसून हे बंगळुरू तेच आपलं कर्नाटकमधलं बंगळुरू आहे. पण तिथल्या खड्ड्यांची अवस्था इतकी वाईट झाली आहे की तिथला रस्ता म्हणजे एखाद्या ग्रहाचा पृष्ठभागच वाटावा! अर्थात, मुंबईकरांना अशा खड्ड्यांची जरी सवय असली, तरी खड्ड्यांची ही समस्या सर्वांसमोर आणण्यासाठी प्रसिद्ध कलाकार बादल नानजुंदास्वामी यानेच हा अफलातून प्रयोग केला आहे. अभिनेता पूरनचंद याच्या मदतीने बादलने हा व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओतल्या अंतराळवीराची भूमिका पूरनचंदने साकारली आहे.

भन्नाट कल्पनेमुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर धम्माल करतोय. नेटिझन्सच्या तुफान प्रतिक्रिया या व्हिडिओवर पडत आहेत.

मुंबईच्या रस्त्यांवरही उतरणार अॅस्ट्रोनॉट?

एकीकडे सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असताना दुसरीकडे प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम देखील या व्हिडिओनं केलं आहे. त्यामुळे आता बंगळुरूप्रमाणेच मुंबईच्या रस्त्यांवर देखील एखादा अंतराळवीर उतरताना दिसला, तर आश्चर्य वाटायला नको!