सगळं नॉर्मल झाल्यावर Work From Home चं काय होणार? बिल गेट्स म्हणतात…!

bill gates
बिल गेट्स

भारतात गेल्या ६ महिन्यांपासून आणि जगभरात गेल्या ९ महिन्यांपासून कोरोनाचं अस्तित्व आहे. कोरोनाचा वेगाने प्रसार होत असताना अनेक देशातल्या अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम (Work From Home) अर्थात घरूनच काम करण्याची परवानगी दिली. भारतात देखील हेच पाहायला मिळालं. कालांतराने सरकारनेच कंपन्यांमधली कर्मचाऱ्यांची उपस्थिती मर्यादित केल्यानंतर तर सक्तीने वर्क फ्रॉम होम करावं लागलं. मात्र, आता कोरोनाची लस (Corona Vaccine) कधी येईल, याची कोणतीही शाश्वती नसताना सरकारने देखील हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. हे सगळं सुरू असताना कोरोनाची लस आल्यानंतर देखील या वर्क फ्रॉम होमचं काय होणार? याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. त्यासंदर्भात आता जगातले अब्जाधीश, मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊडेशनचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी आपली भूमिका मांडली आहे.

गेल्या ६ महिन्यात भारतात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांचे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कंपन्यांमध्ये न बोलावता देखील काम होऊ शकतं हे कंपन्यांना कळून चुकलं आहे. शिवाय, ऑफिस वगैरेची भानगडही त्यासाठी लागत नाही. दुसरीकडे घरी राहूनच काम केलं तर ते जास्त सोपं आणि सहज होणारं असल्याचं कर्मचाऱ्यांना समजलं आहे. त्यामुळे कोरोना संपून परिस्थिती नॉर्मल होईल तेव्हा हे कर्मचारी किंवा या कंपन्या वर्क फ्रॉम होम सोडून पूर्ववत कामाला सुरुवात करतील का? असा एक प्रश्न सध्या चर्चेत आहे.

वर्क फ्रॉम होम तसंच सुरू राहील!

यावर बोलताना इकोनॉमिक्स टाईम्समध्ये बिल गेट्स (Bill Gates) यांनी भूमिका मांडली आहे. ‘वर्क फ्रॉम होम पद्धत किती बेमालूमपणे आपल्या सिस्टीममध्ये रुजली हे पाहून आश्चर्य वाटतं. आणि मला वाटतंय की कोरोना जगातून हद्दपार झाल्यानंतर देखील ती तशीच सुरू राहणार आहे. पण हे सगळं झाल्यानंतर कंपन्या यावर विचार करतील की कर्मचाऱ्यांनी किती टक्के वेळ ऑफिसमध्ये घालवायला हवा. २० टक्के, ३० टक्के की ५० टक्के. अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांनी ५० टक्क्यांपेक्षाही कमी वेळ ऑफिसमध्ये द्यावा अशी अपेक्षा ठेवतील. उरलेल्या कंपन्या बहुतेक आधीसारख्या पूर्ण क्षमतेने ऑफिस चालवतील’, असं बिल गेट्स म्हणाले आहेत.

जसे फायदे, तसे तोटे देखील!

पण वर्क फ्रॉम होमचे फायदे जसे आहेत, तसेच तोटे देखील असल्याचं बिल गेट्स यांनी नमूद केलं. ‘वर्क फ्रॉम होम प्रत्यक्ष ऑफिसमधल्या कामासारखं नसतं. जर मुलं घरीच असतील, घरं लहान असतील आणि घरात गोंधळ असेल, तर अशा वातावरणात काम करणं कठीण होऊन बसतं. विशेषत: महिलांना घरात बऱ्याच गोष्टींवर लक्ष ठेवाचं असतं. त्यामुळे त्यांच्यासाठी हे जास्तच कठीण होतं’, असं देखील ते म्हणाले.