बागेत भरली पुस्तकांची शाळा! परळमध्ये ‘पुस्तक उद्यान’!

Mumbai
परळ येथील पुस्तक उद्यानाच्या उद्घाटनप्रसंगी- आदित्य ठाकरे
सहसा पुस्तक वाचन म्हटले की डोळ्यांसमोर येते ते वाचानालय किंवा ग्रंथालय. मात्र, आता पुस्तके वाचायची असतील तर केवळ ग्रंथालयासारख्या बंदिस्त ठिकाणी जायची गरज नाही. कारण छान मोकळ्या वातावरणात पुस्तके वाचता यावीत याकरता मुंबईतल्या परळमध्ये खास ‘पुस्तक उद्यान’ चालू करण्यात आले आहे. शिवसेनेचे स्थानिक आमदार अजय चौधरी यांच्या संकल्पनेतून हे पुस्तकांचे उद्यान उभारण्यात आले आहे. शुक्रवारी या अनोख्या पुस्तक उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते.
परळच्या या पुस्तक उद्यानात पुस्तकांचा अनमोल खजिना आपल्याला वाचायला मिळेल. शिवसेनेतर्फे हा अनोखा उपक्रम सुरु करण्यात आला असून त्याला ‘पुस्तकांचे उद्यान’ असे नाव दिले आहे. पुस्तकांच्या या बागेत लहान मुलांना आवडणारी मनोरंजनाची आणि त्याचसोबत अन्य विषयांवरील सखोल ज्ञान देणारी अशी जवळपास एक हजारांहून अधिक पुस्तके आहेत. मुख्य म्हणजे स्थानिकांना या सर्व पुस्तकांचा नि:शुल्क लाभ घेता येणार आहे. पुस्तकांचा हा मोफत खजिना परळकरांसाठी एक पर्वणीच म्हणावी लागेल.

मोफत पुस्तक वाचनाचा लाभ 

“आजच्या बदलेल्या काळामध्ये पुस्तके जास्त प्रमाणात वाचली जात नाहीत. सर्वचजण मोबाईलमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याकरता आम्ही हा नवा उपक्रम राबविला आहे. विशेष म्हणजे या उद्यानामध्ये मुंबईकरांना विवध विषयांवरील हजारो पुस्तकांचा अगदी मोफत लाभ घेता येणार आहे.”
अजय चौधरी, शिवसेना आमदार

पुस्तक वाचनाची गोडी लागेल 

बदलत्या काळानुसार पुस्तक वाचन हे कुठेतरी हरवत चालले आहे. अशा प्रयोगांमुळे मात्र लोकांच्या मनात नक्कीच वाचनाची आवड निर्माण होईल. पुस्तक वाचनाचा आनंदच वेगळा असतो. याकरता शहरात अशी अनेक पुस्तक उद्याने उभी राहायला हवीत. मात्र या उद्यानांमध्ये मोबाईल नेटवर्कचे ‘जॅमर’ बसवावेत. जेणेकरून मोबाईलपासून दूर राहून पुस्तक वाचनाचा आनंद घेता येईल.
आदित्य ठाकरे, नेते, शिवसेना
परळ परिसरात उभारण्यात आलेल्या या पुस्तक उद्यानामुळे मुंबईकरांना वाचनाची एक चांगली रपेट अनुभवता येणार आहे.