भाजप – काँग्रेसमध्ये निवडणूक प्रचारासाठी ‘रॅप साँग’ची लढाई

Mumbai
congress bhakt charitra and bjps modi to ayega hi
काँग्रेस आणि भाजपचे रॅप साँग

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांमधील प्रचाराने मात्र आता वेगळेच स्वरुप घेतले आहे. तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांना समजेल, आवडेल अशा स्वरुपात प्रचार केला जात आहे. काँग्रेसने ‘भक्त चरीत्र’ हे रॅप साँग सोशल मीडियावर टाकले आहे तर गायक आणि कॉमेडीयन देवांग पटेल यांनी भाजपच्या प्रचारासाठी ‘आयेगा तो मोदी ही’ हे रॅप साँग युट्यूबवर अपलोड केले आहे. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काँग्रेसच्या गाण्यावर आक्षेप घेतला आहे. काँग्रेसचे रॅप साँगमध्ये धार्मिक संदर्भ असून ते नकारात्मकता पसरवत असल्याचा आरोप तावडे यांनी केला आहे. तसेच या गाण्यासंबंधी महाराष्ट्राचे सीईओंकडे तक्रार करणार असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.

काँग्रेसचे भक्त चरीत्र

भाजपच्या धोरणांना विरोध करण्यासाठी काँग्रेसने भक्त चरीत्र हे रॅप साँग रिलीज केले आहे. यामध्ये फेक न्युज, द्वेषाची पेरणी, संविधानाचे हनन, धार्मिक भावनांचा दंगलीसाठी वापर अशा विविध मुद्द्यांना हात घालण्यात आला आहे. बीफ बंदीनंतर देशभरात करण्यात आलेल्या लिचिंगचाही यात उल्लेख केला आहे. याच गाण्यावर आता तावडे यांनी आक्षेप घेतला असून हे गाणे आचारसहिंतेचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

भाजपचे, ‘आयेगा तो मोदी ही’

तर भाजपच्या चौकीदार या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी गायक आणि कॉमेडीयन देवांग पटेल यांनी ‘आयेगा तो मोदी ही’ हे गाणे आजच युट्यूबवर अपलोड केले आहे. हे गाणे देखील रॅप साँग आहे. यामध्ये त्यांनी राहुल गांधी आणि महागठबंधनमधील सर्व नेत्यांवर उपरोधिक टीका केली आहे. विरोधकांनी काहीही केले तरी देशात पुन्हा मोदीच येणार, अशी भूमिका या गाण्यातून मांडली आहे.