फेसबुककडून ‘लिब्रा’ क्रिप्टोकरन्सीची घोषणा

फेसबुकचे आभासी चलन ‘लिब्रा’, टेक्स्ट मेसेजप्रमाणे करता येणार वापर

Mumbai

सोशल मीडियामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या फेसबुक कंपनीने आपल्या क्रिप्टोकरन्सीची अर्थात आभासी चलनाची घोषणा केली आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून फेसबुक स्वतःची क्रिप्टोकरन्सी आणणार असल्याची चर्चा सुरू होती. या क्रिप्टोकरन्सीला ‘लिब्रा’ असे नाव देण्यात आले आहे. या क्रिप्टोकरन्सीमुळे जगातील डिजीटल पेमेंटची परिभाषा देखील बदलू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘लिब्रा’ या आभासी चलनाची घोषणा फेसबुकने केली असून लवकरच याला सादर करण्यात येणार आहे. फेसबुकने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून याची घोषणा केली.

येणाऱ्या वर्षात पेमेंटची सिस्टीम उपलब्ध

लिब्रा नेटवर्कच्या अंतर्गत फेसबुक आपली डिजीटल करन्सी आणणार असून सुरक्षित व्यवहारासाठी कॅलीब्रा हे डिजीटल वॉलेट देखील लाँच केलं जाईल अशी घोषणा करण्यात आली आहे. ‘लिब्रा’ करन्सी वापरून एखाद्याला पैसे पाठवताना तसेच स्वीकारताना कोणत्याही प्रकारचे जास्तीचे चार्जेस लागू होणार नाही. पुढील येणाऱ्या वर्षात ही पेमेंटची सिस्टीम सर्वांसाठी उपलब्ध होणार असून व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेंजरवरही व्यवहार करणं सोपे होणार आहे. यासाठी फेसबुकने कॅलीब्रा या डिजीटल वॉलेटचीही घोषणा केली आहे. हे सर्व व्यवहार कॅलीब्राच्या माध्यमातून होणार असल्याने अत्यंत सुरक्षित असतील, असा दावा कंपनीने केला आहे.

इतर चलनांच्या तुलनेत ‘लिब्रा’चा वापर वाढेल

फेसबुकशिवाय ‘टेलिग्रमान’, ‘सिग्नल’, ‘जे.पी. मॉर्गन’, आणि ‘मायक्रोसॉफ्ट’ अशा कंपन्याही येणाऱ्या काळात चलन व्यवसायत उतण्याची शक्यता आहे. फेसबुकचे जगभरातील युजर्स पाहिले तर इतर चलनांच्या तुलनेत ‘लिब्रा’चा वापर वाढेल, अशी शक्यता तज्ज्ञाकडून वर्तवली जात आहे.

क्रिप्टोकरन्सी म्हणजे…

‘क्रिप्टोकरन्सी’ हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, आपण याचा वापर आर्थिक देवाणघेवाणीसाठी करू शकतो. २००९ साली सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्याने ‘बिटकॉइन’ची संकल्पना जन्माला घातली. एका संगणकीय प्रोग्रॅममधील गणितीय आकडेमोड करून ‘बिटकॉइन’ अस्तित्वास आले. त्यानंतर गेल्या दशकभरात शेकडो प्रकारच्या ‘क्रिप्टोकरन्सी’ संगणकीय जगात निर्माण झाल्या. अशा प्रकारच्या आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असतात