सैनिकांची मोफत दाढी करणारा ‘अवलिया’

व्यवसायाने नाव्ही असलेला हा अवलिया, सैनिकांची चांदीच्या वस्तऱ्याने दाढी करतो आणि तिही मोफत!

Mumbai

आपण सुरक्षित राहावं, आपला देश सुरक्षित राहावा यासाठी भारतीय जवान अहोरात्र बॉर्डवर तैनात असतात. ‘ते’ सीमेवर सतर्क असतात म्हणून आपण घरामध्ये शांत झोप घेऊ शकतो. ते स्वत:च्या जीवाची पर्वा करत नाहीत, म्हणून आपण आपलं आयुष्य बिनधास्त जगू शकतो. अशा या जवानांना बरेच लोक आपापल्यापरीने मानवंदना देत असतात. लोकं जसं जमेल त्या पद्धतीने सैनिकांबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त करत असतात. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवानांना सलाम करणारा असाच एक अवलिया आहे. उद्धव गाडेकर असं या तरुणाचं नाव असून तो अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने जवानांना मानवंदना देतो.

चांदीच्या वस्तऱ्याने दाढी

बुलढाणा जिल्ह्यातील केळवद गावात राहणाऱ्या उध्दवचं स्वत:च सलून (केश कर्तनालय) आहे. आपला सलूनचा व्यवसाय सांभाळता सांभाळता तो समाजसेवाही करतो. सुट्टीसाठी गावात आलेल्या भारतीय जवानांचा सन्मान म्हणून उद्धव त्यांची निशु:ल्क दाढी करुन देतो. इतकंच नाही तर जवानांची दाढी करण्यासाठी तो खास चांदीचा वस्तरा वापरतो. विशेष म्हणजे उद्धव त्याच्या गावातील आणि आसपासच्या काही गावातील माजी सैनिकांना देखील ही सेवा पुरवतो. ‘हे सैनिक सेवानिवृत्त झाले असले तरी कधीकाळी त्यांनी आपल्या देशासाठी प्राण पणाला लावले होते. त्यामुळे आपण त्यांचं काहीतरी देणं लागतो’, या भावनेतून उद्धव माजी सैनिकांचाही मोफत दाढी करतो. उद्धवच्या या अनोख्या उपक्रमाचं कौतुक होत आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात उद्धवच्या या भन्नाट कार्याची दखल घेतली जात आहे. सोशल मीडियावर हे वृत्त व्हायरल होताच नेटिझन्सकडून उद्धववर कौतुकाची थाप पडत आहे.

याआधीही केले होते ‘समाजकार्य’

हा अनोखा उपक्रम राबवणारा उद्धव म्हणतो की, ‘एक नाव्ही म्हणून जवानांना मानवंदना देण्यासाठी मी इतकंच करु शकतो. वस्तरा हे माझ्या उपजिवीकेचं साधन आहे. त्याचा वापर करुन मी माझ्यापरीने जवनांना सॅल्युट करण्याचा प्रयत्न करतो’. विशेष म्हणजे याआधीही उद्धवने असाच एक सामाजिक उपक्रम राबवला होता. ‘बेटी बचाओ’ आंनोलनाला पाठिंबा म्हणून गावात ज्या वडिलांना किमाम १ मुलगी आहे, त्यांची उद्धव मोफत दाढी करुन द्यायचा.