घरट्रेंडिंगसोशल मीडियाचा किळसवाणा चेहरा; 'कोल्हापूरचा ओबामा' बळी

सोशल मीडियाचा किळसवाणा चेहरा; ‘कोल्हापूरचा ओबामा’ बळी

Subscribe

स्वतःच्या करमणुकीसाठी कोल्हापूरातील एका विकलांग मुलाचा वापर होत असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अंत्यत किळसवाणा असा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे.

“कमलेश बस की बस, केवढासा हाईस…” या वाक्याची सध्या कोल्हापुरात जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकांच्या मोबाईलमध्ये सध्या कोल्हापूरचा ओबामा असे शीर्षक असलेले अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाच्या तोंडात कमलेशचे नाव आहे. कमलेशचा व्हिडिओ पाहताच कोल्हापूरची पोरं वेड्यासारखी हसताना दिसतात. युट्यूबवर कोल्हापूरच्या ओबामा नावाने सर्च कराल तर अनेक व्हिडिओ आहेत, ज्याला हजारोंनी व्ह्यूज मिळालेल्या आहेत. काही टवाळखोरांनी हे व्हिडिओ बनवले असून ज्या तथाकथित कमलेशला या व्हिडिओत दाखवले आहे, त्याचे खरे नाव विनायक मकणापुरे असून तो मानसिक विकलांग आहे.

कोल्हापूरातील टिबंर मार्केट परिसरात राहणारा १४ वर्षीय विनायक मकणापुरे! लहान पणापासून विकलांग असून शिवाजी पेठ, उत्तरेश्वर पेठ, मंगळवार पेठ परिसरात त्याला कोल्हापूरचा ओबामा म्हणून ओळखतात. गेल्या महिनाभरात विनायकचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे विनायकचा ओबामा आणि ओबामापासून कमलेश कधी झाला, हे त्याला देखील कळले नाही. पण त्याच्या विकलांग होण्याचा फायदा काही टवाळखोरांनी चांगलाच घेतला आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर लाईक आणि कमेंट मिळवण्यासाठी त्याचे रोज रोज नवीन व्हिडिओ काढले जाऊ लागले. त्यासाठी त्याला खाऊचे आमिष दाखवू लागले. तर पुढे पुढे व्हिडीओ करण्यासाठी काही टवाळखोर त्याला गांजा, दारू आणि सिगारेटची नशा देऊ लागले आहेत. सध्या युट्युबवरसुद्धा ‘कोल्हापूरचा ओबामा’ असे स्वतंत्र चॅनेल काढून त्याचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. व्हिडिओ बनवून युट्यूब, टिक टॉक, फेसबुक, व्हाट्सअॅपवर शेअर केले जाऊ लागले आहेत. त्याला रोज पाहणारे हजारो आहेत. त्यामुळे अनेकांची चांगली करमणूक होत आहे. सकाळी सकाळी काही टवाळखोर त्याला घरी न्यायला जातात, तर दिवसभर उंडारून परत विनायकला नशेतच त्याच्या घरी सोडले जाते. काहीजण तर त्याच्या नावावर पैसेही उकळू लागले आहेत. त्यामुळे वैतागलेल्या विनायकच्या वडिलांनी थेट शहर डीवायएसपी डॉ. प्रशांत अमृतकर यांचे कार्यालय गाठले.

आपल्या मुलाच्या अंपगत्वाची चेष्टामस्करी त्यांना सहन होत नसल्याने त्यांनी आता हे बंद करण्याचे आवाहन केले आहे. विनायक विकलांग जरी असला तरी तो माणूस आहे. त्याच्या परिस्थितीचा फायदा घेत, त्याला व्यसन लावू नये, इतकीच त्याच्या वडिलांची इच्छा आहे. मी शाळेत जाणार! चांगला वागणार! आणि गांजा, दारू, सिगारेट पिणार नाही, असे विनायक पत्रकारांना सांगतो. सोशल मीडियावर कधी कोण प्रसिद्ध होईल, हे सांगता येत नाही. पण मनोरंजनासाठी एखाद्याच्या आयुष्याची अशी चेष्टामस्करी करणे किती योग्य आहे? असा सवाल विनायकचे वडील सुरेश मनाकापुरे यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -