घरट्रेंडिंगरामदास आठलेंच्या संसदेतील कवितेमुळे 'हे' कवी झाले नाराज

रामदास आठलेंच्या संसदेतील कवितेमुळे ‘हे’ कवी झाले नाराज

Subscribe

लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहात खासदारांकडून आपले भाषण प्रभावी व्हावे यासाठी कविता, शेर सादर केले जातात. मात्र चुकीच्या पद्धतीने कविता सादर केल्यामुळे एक आघाडीचे कवी नाराज झाले आहेत.

बॉलिवूडमधील ज्येष्ठ गीतकार आणि एकेकाळी संसदेत आपल्या वक्तृत्वाने कलाक्षेत्रातील विषयांना वाचा फोडणारे माजी खासदार जावेद अख्तर यांनी संसदेत खासदारांकडून सादर होत असलेल्या कवितांवर नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहात खासदार आपल्या भाषणाला खुमासदार करण्यासाठी कविता सादर करतात. पण ते करत असताना कवितेची मोड तोड करण्यात येते. ‘कविता’ या प्रकाराची वाट लावणाऱ्या अशा खासदारांना जावेद अख्तर यांनी हात जोडून विनंती करत असे न करण्याचे आवाहन ट्विटरवर केले आहे. अख्तर यांचा रोख हा रामदास आठवले यांनी शुक्रवारी सादर केलेल्या कविताकडे होता असे दिसते. कारण आठवले यांनी शुक्रवारी अविश्वास प्रस्तावावेळी कविता सादर केली होती. अख्तर यांच्या ट्विटमध्ये कोणत्याही खासदाराचे नाव लिहिले नसले तरी त्यांचा रोख हा आठवले यांच्याकडे असल्याचे ट्विटखाली आलेल्या रिप्लायवरुन कळून येते.

- Advertisement -

मागच्या आठवड्यात लोकसभेत तेलगू देसम पार्टीच्यावतीने मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावावर सुमारे १२ तास चर्चा झाली होती. या चर्चेदरम्यान राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच भाषणे लोकांच्या लक्षात राहिली असली तरी त्याच्या खालोखाल रामदार आठवले यांचेही भाषण चांगलेच गाजले होते. आठवले यांनी काहिशी अडखळत, माहिती घेत घेत सादर केलेल्या कवितेवर पंतप्रधान मोदी देखील आपले हसू आवरू शकले नव्हते. राहुल गांधीसहीत सर्वच खासदारांनी आठवलेंची कविता एन्जॉय केली होती. मात्र आठवले सादर करत असलेली कविता ही त्यांच्या शैलीत असते. त्याला अभिजात कवितेचे कोणतेही नियम आड येत नसतात. संसदेत असे अनेक खासदार कवितेच्या बाजाची मोड-तोड करुन सादरीकरण करतात, त्यावर अख्तर यांनी खंत व्यक्त केली आहे.

- Advertisement -

जावेद अख्तर यांच्या ट्विटवर काही नेटिझन्सनी आठवले यांच्या नावाने मजेशीर कमेंट केल्या आहेत.

 

मात्र काही नेटिझन्सनी आठवले यांची बाजू उचलून धरली आहे. “आठवले वीस वर्षांपासून कविता करत आहेत, त्यांची ती स्टाईलच आहे, ते कुणाला कॉपी करत नाहीत”, अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे. तर महेश सातपुते नामक युजरने आठवले हे पैसे न घेता कविता करतात, त्यांच्या कवितामुळे वातावरण हलकं होतं, त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. 

मात्र जावेद अख्तर यांच्या या ट्विटला संदिप पारेख यांनी ट्रोल केले आहे. अख्तर यांच्या ट्विटमधील इंग्रजी भाषेत अनेक व्याकरणाच्या चुका असल्याचे पारेख यांनी दाखवून दिले आहे. “सर जो न्याय तुम्ही कवितासाठी मागत आहात, तोच न्याय इंग्रजी भाषेलासुद्धा हवा आहे”, अशी खोचक टीका संदिप पारेख यांनी केली आहे.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -