शिवसेनेला मतदान केल्याचा कांगावा अंगलट येताच कंगनाने ट्विट केले डिलीट

लोकशाहीचा विजय... पत्रकारावर खोटे आरोप करुन तुरुंगात डांबण्याची भाषा करणाऱ्या कंगनाचा कांगावा काही तासांतच झाला उघड.

Kangana tweet deleted
कंगनाने अंगलट येणारे ट्विट केले डिलीट

“मी एक क्षत्राणी आहे. सर कट सकती हू, लेकिन सर झुका सकती नही”, अशा फुकाच्या घोषणा करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतला पत्रकाराशी घेतलेला पंगा चांगलाच महागात पडला आहे. ‘मी शिवसेनेला जबरदस्ती मतदान केले’, अशी फुशारकी कंगनाने मारली होती. मात्र तिच्या दाव्यातील कांगावा पत्रकार कमलेश सुतार यांनी सप्रमाण उघड केला. त्यानंतर राणाभीमदेवी थाटात पत्रकार कमलेश यांना कोर्टात खेचायची धमकी कंगनाने दिली. मात्र आपली चूक उमगल्यानंतर दिलगिरी व्यक्त करण्याची तसदीही न घेता, तिने चोरपावलाने आपले ट्विट डिलीट केले आहे.

पत्रकार कमशेल सुतार यांनी विचारलेल्या प्रश्नांना कंगनाने उत्तर तर दिले नाहीच. शिवाय तिने स्वतःच्या दाव्याला समर्थन करणारी इतर ट्विटही डिलीट केली आहेत. तसेच कमलेश सुतार यांना ट्विटरवर ब्लॉक देखील केले आहे. कमलेश सुतार यांनी हा लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया ट्विटरवर दिली आहे.

शिवसेनेशी पंगा घेतल्यानंतर कंगनाने कालच मी क्षत्रिय असल्याचे म्हटले होते. “मान, सन्मान, स्वाभिमानासोबत मी गर्वाने राष्ट्रवादी बनून जगत राहिल. तत्त्वांशी कधीही तडजोड करणार नाही. जय हिंद.” अशा आशयाचे ट्विट करुन कंगनाने धुरळा केला होता. मात्र एका दिवसात तिचे ट्विट किती तकलादू असतात याची प्रचिती सर्वांना आली आहे.

पत्रकाराला कोर्टात खेचण्याची भाषा वापरल्यानंतर आपलं महानगरने कडक शब्दात कंगनाच्या या वक्तव्याचा समाचार घेतला होता. कमलेश सुतार यांना दिलेल्या धमकीचा निषेध करत माय महानगरने बातमी दिली होती. ट्विटरवर या बातमीला नेटीझन्सनी चांगलीच पसंती दिली आहे.

कंगनाने टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेनेला मनाच्या विरुद्ध जाऊन मतदान केल्याचा कांगावा केला होता. तो व्हिडिओ खालील ट्विटमध्ये एम्बेड केलेला आहे. सोबतच नेमक्या कोणत्या मुद्द्यावर कमलेश सुतार यांनी कंगनाची पोलखोल केली त्याबद्दलही खालील ट्विटमध्ये माहिती दिली आहे.