Laughter Day: विरोधकांनो हास्यास्पद वर्तन थांबवा; रोहित पवार, जयंत पाटलांचे चिमटे

एकेकीळी सोशल मीडियावर ताबा ठेवणाऱ्या नेत्यांवर आता सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे.

Mumbai
Rohit pawar and jayant patil
राष्ट्रवादीचे तरुण आमदार रोहित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

आज जागतिक हास्य दिन आहे. यानिमित्ताने राज्यातील सत्ताधारी पक्ष विरोधकांची फिरकी घेताना दिसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि तरुण आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर विरोधकांना चिमटे काढले आहेत. ‘सोशल मीडियातील टिका थांबवणे ही जीवनावश्यक सेवा आहे का?’ असे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे. तर रोहित पवार म्हणाले की, ‘विरोधकांनी हसण्यावर रागवण्यापेक्षा हास्यास्पद वर्तन थांबवावे.’ दोन्ही नेत्यांच्या ट्विटमुळे यावर्षीचा जागतिक हास्य दिन मात्र लोकांपर्यंत पोहोचलाय.

जयंत पाटील यांनी चार ट्विटच्या मालिकेतून विरोधकांना आपल्या पद्धतीने टोला लगावला. “भाजपा नेते सोशल मीडियात त्यांच्या चुकांवर बोट ठेवणार्‍या नागरिकांवर कारवाईची मागणी करत आहेत. हि मागणी करण्यापुर्वी त्यांनी ‘आघाडी बिघाडी’, ‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ पेजेस कोण चालवत होते, त्याच्या जाहिराती करण्यासाठी कोण पैसे देत होते, याची माहिती आधी जाहीर करावी.”, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

तसेच “आज संपूर्ण जग कोरोना सोबत लढत असताना, भाजपा नेते मात्र राज्यपाल, पोलीस आयुक्त यांच्याकडे जाऊन आमच्या वरील टिका थांबवा, अशी मागणी करत आहेत. यातून भाजपा नेत्यांचे प्राधान्यक्रम कोणते आहेत, हेच यातून स्पष्ट होते. सोशल मीडियातील टिका थांबवणे हि जीवनावश्यक सेवा आहे का?”, असा सवाल देखील जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

तर दुसऱ्या बाजुला कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही एका ट्विटमधून विरोधकांवर उपरोधिक टीका केली. “लोक हसतात म्हणून विरोधी पक्षाचे नेते CP ना भेटल्याची बातमी वाचून मलाच हसू आवरेना.
या नेत्यांना मला सांगायचंय, लोकांच्या हसण्यावर रागावण्यापेक्षा हास्यास्पद वर्तन थांबवा आणि राज्याच्या हितासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यास सरकारला सहकार्य करा.” असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र येऊन भाजपच्या नेत्यांवर सोशल मीडियावर तुटून पडतात. भाजपच्या नेत्यांनी एखादी पोस्ट टाकल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून त्यावर हसणारी स्माईली टाकली जाते. या गोष्टी वारंवार होत असल्यामुळेच कदाचित भाजपच्या नेत्यांनी सीपींची भेट घेतली असावी, असा अंदाज जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादीकडून चौकशीची मागणी

दरम्यान विरोधकांच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादीकडूनही गृहमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले आहे. यामध्ये राजकीय नेत्यांच्या ट्रोलिंगबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली असून मागच्या सहा सात वर्षांपासून होणाऱ्या ट्रोलिंगची चौकशी लावण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया समन्वयक, आरटीआय कार्यकर्ते नितीन यादव, मोहसिन शेख, अमित परांडकर आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष्य अमोल काटे यांनी ही मागणी केली आहे.

ncp letter to home minister
राष्ट्रवादीचे पत्र