बिहारमधील पूरात ‘या’ मॉडेलने केलं फोटोशूट

हे फोटो बघून अनेक नेटकऱ्यांनी फोटोग्राफर आणि मॉडेलवर केली टीका

patana

मुसळधार पावसाने सध्या बिहारला झोडपल्याने तिथे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. बिहारमधील पाटनासह १५ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. बिहार राज्यातील मुसळधार पावसाने आणि तेथील पूरजन्य परिस्थितीमुळे आतापर्यंत अनेकांचे प्राण देखील गेले आहे. एकीकडे बिहारमधील पावसाने थैमान घातले असताना पाटनामधील एका तरूणी मॉडेलने केलेले फोटोशूट चांगले चर्चेत आले आहे.

सोशल मीडियावर या मॉडेलचे फोटो व्हायरल होत असून ही मॉडेल तरूणी पाटनामधील असून तेथील NIFT ची विद्यार्थी असून तिचे नाव अदिती सिंह असे आहे. ही तरूणी पुरातील पाण्यात वेगवेगळ्या ठिकाणी पोझ देताना व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये दिसत आहे. हे फोटो बघून अनेक नेटकऱ्यांनी फोटोग्राफर आणि मॉडेलवर टीका केली आहे. ‘पूरपरिस्थिती असताना अशाप्रकारचे फोटोशूट करणं हे अत्यंत चुकीचे आहे, असे नाही. मात्र अशाप्रकारचे शूट करून पूरग्रस्तांची खिल्ली उडवत आहे.’ अशीही टीकाही काही नेटकऱ्यांनी केली आहे.

हे फोटोशूट फोटोग्राफर सौरव अनुराज यांनी आपल्या फेसबुकवर तसेच इंस्टाग्रामवरही शेअर केले आहे. हे फोटो शेअर केल्यानंतर काही नेटकऱ्यांनी कौतुक केले तर काहींनी त्यांच्यावर जोरदार टीका केली, यानंतर त्यांनी याविषयावर सारवा-सारव करण्याचा प्रयत्न केला आहे.  बिहारची राजधानी पटना याठिकाणी या मॉडेलने फोटोशूट करून बिहारमधील पूरपरिस्थिती समस्येवर लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला असून अनेकांनी या पूरग्रस्तांना मदत करावी असा संदेश होता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.