Video: हातात कोयता घेऊन TikTok व्हिडिओ; थेट पोलीस ठाण्यात रवानगी

Pimpri Chinchwad
tik tok video police arrest
हातात कोयता घेऊन व्हिडिओ काढणं पडलं महागात

सध्या सोशल मीडियावर टिकटॉक अॅपचा बोलबाला आहे. त्यांचे लाखो युजर असून त्यावर आपल्यातील सुप्त गुण व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर मांडता येतात. परंतु, टिकटॉक अॅप वरील असाच एक व्हिडिओ वाकड पोलिसांच्या हाती लागला आणि तरुणांची रवानगी थेट पोलीस ठाण्यात झाली आहे. दीपक आबा दाखले (वय -२३ वर्ष, रा.राहटणी, पिंपरी-चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर या अगोदर देखील गुन्हा दाखल असून ‘वाढीव दिसताय राव’ या लावणीवर कोयता घेऊन व्हिडिओ काढणं त्याला चांगलंच महागात पडलं आहे. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हरीश माने यांच्या हाती एक टिकटॉक व्हिडिओ लागला. त्यात ‘वाढीव दिसताय राव… लई वाढीव दिसताय’ या लावणीवर आरोपी दीपक हा हातात कोयता घेऊन घरा बाहेर पडताना दिसत असून प्लेबॅकला लावणी गीत ठेवलं आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शहरात व्हायरल झाला. सदर व्हिडिओ वाकड पोलीस ठाण्याच्या पोलिसांपर्यंत पोहोचला.

त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने व्हिडिओतील मुलाचा शोध घेऊन घराच्या आजूबाजूने सापळा लावून आरोपी दीपकला अटक केली. दरम्यान, त्याला पोलीस ठाण्यात आणले असता पोलिसी खाक्या दाखवत पोलीस देखील आरोपीच्या बाबतीत वाढीव असतात हे दाखवून दिलं. आरोपी दीपकवर आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने आणि गुन्हे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हरीश माने यांच्या पथकाने केली असून कोणी जर अशाप्रकारे दहशत माजविण्याच्या उद्देशाने व्हिडिओ काढत असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन वाकड पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here