मोकळ्या हवेसाठी तिने चक्क विमानाचं एक्झिट डोअरच उघडलं!

मोकळी हवा पाहिजे म्हणून एका महिलेने चक्क धावत्या विमानाचं इमर्जन्सी डोअरच उघडल्याचा प्रकार चीनमध्ये घडला आहे. या महिलेला अटक करण्यात आली आहे.

Beijing
china flight

कोणत्याही प्रवासी विमानाच्या मधोमध, सगळ्यात पुढे आणि सगळ्यात मागे अशी किमान तीन एक्झिट डोअर अर्थात सुरक्षा दरवाजे असतात हे आपल्यापैकी बहुतेकांना माहिती आहे. विमान प्रवास नियमित करणाऱ्यांना तर हे सवयीचं आहे. हेच एक्झिट डोअर जर अचानक उघडले, तर किती मोठी दुर्घटना घडू शकते, याचाही अंदाज आपल्यापैकी अनेकांना आहे. पण अशाच एका विमानातून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाने विमानात मोकळी हवा मिळत नाही, असं सांगत मोकळ्या हवेसाठी चक्क विमानाचं एक्झिट डोअरच उघडलं. विमान उड्डाण घेण्यासाठी रनवेवरून धावण्याच्या तयारीत असताना हा धक्कादायक प्रकार घडला. सुदैवाने आतल्या प्रवाशांनी आणि केबिन क्रूने ही बाब लागलीच पायलटच्या लक्षात आणून दिल्यामुळे उड्डाण थांबवण्यात आलं आणि मोठी दुर्घटना टळली.

थोडी हव्वा आने दे!

ही घटना आहे चीनच्या वुहान तियान्हा आंतरराष्ट्रीय विमानतळावरची. शियामेल एअरलाईन्सच्या ८२१५ क्रमांकाच्या विमानात हा प्रकार घडला. हे विमान वुहान विमानतळावरून उड्डाण घेण्याच्या तयारीत असतानाच अचानक एक्झिट डोअरजवळ बसलेली एक महिला उठली आणि ‘मला मोकळी हवा हवी आहे’, अशी तक्रार फ्लाईट क्रूकडे करू लागली. ती एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने चक्क विमानाचा आपातकालीन दरवाजा अर्थात इमर्जन्सी डोअर उघडण्याचा प्रयत्न सुरू केला. विमानातल्या कर्मचाऱ्यांनी सदर महिलेला ताकीद देऊन देखील तिने दरवाजाच्या हँडलने हा दरवाजा उघडला. यावेळी विमान धावपट्टीवर होतं आणि उड्डाण करण्यासाठी धावण्याच्या तयारीत होतं.

याआधीही चीनमध्येच अशीच घटना

दरम्यान, या प्रकारानंतर तात्काळ विमानतळ पोलिसांनी या महिलेला अटक केली. या सगळ्या प्रकारात किमान तासभर हे विमान विमानतळावरच ताटकळलं. अखेर सदर महिलेच्या अटकेचे सोपस्कार पूर्ण केल्यानंतर आणि विमानाची सुरक्षा तपासणी केल्यानंतर अखेर या विमानानं उड्डाण केलं. अशीच एक घटना चीनमध्येच गेल्या वर्षी घडली होती. २५ वर्षाच्या एका तरुणाने विमानाचं इमर्जन्सी डोअर उघडलं होतं. या तरुणाला ११ हजार डॉलरचा दंड ठोठावण्यात आला होता.