तरुणांनो…रक्तदाबाची पातळी वेळीच ओळखा!

Mumbai
high-blood-pressure-hypertension-symptoms
उच्च रक्तदाब प्रातिनिधिक फोटो
बदलती जीवनशैली, धावपळीचं जीवन, सतत जॉबसाठीची स्पर्धा आणि सतत मोबाईलचा वापर या सगळ्यामध्ये तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यस्त असते. नकळतच आजूबाजूला आजारांचा विळखा जडतो. गेल्या काही वर्षात उच्च रक्तदाब आणि त्याच्याशी संबंधित आजार असलेल्या तरुणांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. असे असूनही तरुण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.  ३० ते ६० या वयोगटातील ३० टक्के व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. तर, तब्बल ४३% तरुणांना रक्तदाबाची सामान्य पातळी (रेंज) माहीतच नसते. त्यामुळे तरुणांनी आपल्या रक्तदाबाची पातळी वेळीच ओळखली पाहीजे, असा सल्ला तज्ञ डॉक्टर देतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार…

दरवर्षी १७ मे रोजी जागतिक उच्चरक्तदाब दिन पाळला जातो. याचं पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार,  वेळेआधी मृत्यू होण्यासाठी उच्च रक्तदाब हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. २००५ साली करण्यात आलेल्या विश्लेषणानुसार २०.६% भारतीय पुरुष आणि २०.९% भारतीय महिलांना उच्च रक्तदाब आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या २००८ सालच्या आकडेवारीनुसार भारतीयांमध्ये उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींच्या संख्येत ३२.५% (पुरुषांमध्ये ३३.२% तर महिलांमध्ये ३१.७%) वाढ झाली आहे. तर, ऑनलाईन सर्वेक्षणामध्ये २० ते ३० या वयोगटातील ५०० व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यापैकी २१८ जणांना, रक्तदाबाची सामान्य पातळी ९० ते १४० असते हे माहीतच नव्हते. तर, पालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, मुंबईत रक्तदाब असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१७ या दोन वर्षाच्या कालावधीदरम्यान  तब्बल ७३ लाख ७४ हजार ६०२ रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील २३ टक्के लोक हे उच्चरक्तदाबाचे रुग्ण आढळले आहेत.

या क्षेत्रातील तरुणांना उच्च रक्तदाबाचा त्रास

करिअरकेंद्री जीवनशैलीवर भर दिल्यामुळे तरुणांकडून आरोग्याकडे दुर्लक्ष होते. पूर्वीच्या तुलनेत अलिकडच्या काळात उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या तरुणांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. बँकिंग, आयटी आणि प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या अति तणाव असलेल्या नोकऱ्यांमुळे तरुणांची झोप अनियमित असते, जेवणाच्या वेळा चुकतात. जंकफूड अन्नपदार्थ खाण्याचे प्रमाण अधिक असते, व्यायामाचा अभाव आणि अपुरी झोप यामुळे ते अत्यंत तणावपूर्ण आयुष्य जगत असतात. या आधुनिकीकरणामुळे तरुणांकडून आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि तरुणपणीच हृदयविकार जडतात. गेल्या १५ वर्षांत २५ ते ४० या वयोगटातील उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींच्या संख्येत १० ते १५% वाढ झाल्याचे दिसून आले असल्याचे कार्डिओ डायबेटिस एक्स्पर्ट डॉ. अमोल पवार हे सांगतात.
आजच्या विकसनशील देशांमध्ये जीवनशैली, ताण, प्रदूषण, कामाच्या ठिकाणी असलेले वातावरण आणि खानपानाच्या सवयी यामुळे दर पाचपैकी एका व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. भारतीय आकडेवारीनुसार २०२५ सालापर्यंत दोनपैकी एका व्यक्तीला उच्च रक्तदाब असेल. निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत थोडी तरी शिस्त पाळणे आवश्यक आहे.
डॉ. प्रतीक सोनी ,हृदयविकार तज्ज्ञ, वोक्हार्ट रुग्णालय

उच्च रक्तदाबापासून वाचण्यासाठी काय कराल?

  • प्रत्येकाने दर तीन महिन्यांनी रक्तदाब तपासून घेणे आवश्यक आहे आणि ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी दर आठवड्याला रक्तदाबाची तपासणी करून घेणे आवश्यक आहे
  • फास्ट फूड पदार्थांचे सेवन टाळा
  • मिठाचे जास्त सेवन नको
प्रत्येक प्रकारच्या पॅकेज्ड पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण असते, त्यामुळे अर्थातच सोडियम सेवनाचे प्रमाण वाढते. यातूनही तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाचा त्रास वाढल्याचे दिसून येत आहे, असं मधुमेह तज्ज्ञ डॉ. प्रदीप गाडगे सांगतात.